उत्तर कोरियाकडून आठ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणीसेऊल – रविवारी उत्तर कोरियाने आठ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करून खळबळ उडविली. यात छोट्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. शनिवारी अमेरिका व दक्षिण कोरियाचा व्यापक नौदल सराव संपन्न झाला होता. त्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन अमेरिका व दक्षिण कोरियाला इशारा दिल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. रविवारच्या चाचणीनंतर जपाननेही अमेरिकेबरोबर नवा संयुक्त सराव घेऊन उत्तर कोरियाच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर दिले.

स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ ते दहाच्या मध्ये आठ क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली. राजधानी प्योनग्यँगजवळ असणाऱ्या सुनान, प्योनग्यँगच्या उत्तरेस असणाऱ्या केचॉन, टाँगचँग-रि व हॅमहंग अशा चार ठिकाणांहून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ‘सी ऑफ जपान’च्या दिशेने सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रांचा पल्ला 110 ते 670 किलोमीटर्स इतका होता. ध्वनीच्या तीन ते सहा पट वेग असणाऱ्या या क्षेपणास्त्रांनी 25 ते 90 किलोमीटर्सची उंची गाठल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या लष्कराकडून देण्यात आली आहे.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणीएकाच दिवसात आठ क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याची उत्तर कोरियाची ही पहिलीच वेळ आहे. मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रे सोडून उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाची वाढती ताकद दाखवून दिल्याचे सांगण्यात येते. या वर्षात उत्तर कोरियाने केलेली ही 22वी चाचणी ठरली आहे. तर गेल्या महिन्याभरात घेण्यात आलेली तिसरी चाचणी आहे.

उत्तर कोरियात कोरोनाची साथ सुरू असतानाच, या चाचण्या करून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण क्षेपणास्त्र कार्यक्रमापासून माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. रविवारी केलेल्या चाचण्या या उत्तर कोरियाकडून घेण्यात येणाऱ्या अणुचाचणीची पूर्वतयारी असू शकते, असा दावा काही विश्लेषकांनी केला आहे. तर काही तज्ज्ञांनी सदर चाचणी अमेरिका व दक्षिण कोरियाने केलेल्या सरावावरून दिलेला इशारा असू शकतो, असे म्हंटले आहे.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणीउत्तर कोरियाच्या या नव्या क्षेपणास्त्र चाचणीला अमेरिका व जपानने लष्करी माध्यमातून प्रत्युत्तर दिले. चाचण्यांनंतर काही तासातच दोन्ही देशांनी ‘जॉईंट बॅलेस्टिक मिसाईल एक्सरसाईज’चे आयोजन केले. हा सराव म्हणजे या दोन्ही देशांनी उत्तर कोरियाच्या धमक्यांविरोधात विकसित केलेल्या ‘रॅपिड रिस्पॉन्स कॅपॅबिलिटी’चा भाग असल्याचा दावा जपानच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आला. गेल्याच महिन्यात जपानमध्ये अमेरिका व जपानच्या राष्ट्रप्रमुखांची संयुक्त बैठक पार पडली होती. त्यात उत्तर कोरियाच्या वाढत्या आक्रमकतेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यावर एकमत झाले होते.

एप्रिल महिन्यात झालेल्या महिन्यात लष्करी संचलनामध्ये उत्तर कोरियाने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र उतरवून अमेरिकेला इशारा दिला होता. याच लष्करी संचलनात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी अणुचाचणीची घोषणाही केली होती. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस ‘आयसीबीएम’अर्थात आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने आपण मोठ्या चाचणीची तयारी करीत असल्याचे संकेत दिले होते. या चाचणीनंतर अमेरिका व सहकारी देशांनी उत्तर कोरियावर निर्बंध टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चीन व रशियाने यासंदर्भातील प्रस्ताव सुरक्षा परिषदेत फेटाळून लावला होता.

leave a reply