इम्रान खान यांचे पाकिस्तानच्या लष्कराशी जुळवून घेण्याचे प्रयत्न

इस्लामाबाद – पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांच्याबरोबर आपला काहीच ‘प्रॉब्लेम’ नाही. पण त्यांना माझ्यापासून प्रॉब्लेम असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी हे दावे केले. त्याच्या आधी इम्रान खान यांनी अमेरिकेच्या लोकप्रतिधींकडे आपल्याला सहाय्य करण्याची याचना करणारी ऑडिओ टेप प्रसिद्ध झाली. यामुळे आपण कुठल्याही परदेशी शक्तीशी तडजोड करीत नाही, असा बाणेदारपणा दाखविणाऱ्या इम्रान खान यांचा नव्याने पर्दाफाश झाल्याचे दिसत आहे.

इम्रान खान यांचे पाकिस्तानच्या लष्कराशी जुळवून घेण्याचे प्रयत्नपाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालायने केलेल्या हस्तक्षेपामुळे इम्रान खान यांना जामीन मिळाला. मात्र त्यांच्या ९ मे रोजीच्या अटकेनंतर पाकिस्तानात ठिकठिकाणी हिंसाचार पेटला होता, याची जबाबदारी इम्रान खान यांच्यावरच असल्याचे सरकार सांगत आहे. याविरोधात इम्रान खान यांच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे. यासाठी इम्रान खान यांच्या लाहोरमधील घराला पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनी घेरलेले आहे. तसेच इम्रान खान यांच्या पक्षातून काहीजण बाहेर पडू लागले असून पुढच्या काळात त्यांना असे धक्के बसत राहतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानात जाळपोळ करून व हिंसाचार आणि अस्थैर्य माजवून इम्रान खान पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान होऊ पाहत आहेत. पण त्यांची वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा आता पाकिस्तानच्या मूळावर आलेली आहे, अशी जोरदार टीका सरकार तसेच लष्कराकडून केली जाते. इतकेच नाही तर इम्रान खान यांनी १९७१ सालच्या परिस्थितीचा दाखला देऊन पूर्व पाकिस्तान लष्कराच्या अत्याचारामुळेच वेगळा झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली, याची आठवण करून दिली. यावरही पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

इम्रान खान आपल्याला पाकिस्तानचे पंतप्रधानपद मिळाले नाही, तर देशाचे तुकडे पडतील, अशी धमकी उघडपणे देत आहेत. त्याचवेळी आजवरच्या पाकिस्तानच्या घोडचुकांना लष्करच जबाबदार असल्याचे इम्रान खान जगजाहीर करीत आहेत. यामध्ये अबोटाबाद येथील लष्करी तळाजवळ ओसामा बिन लादेन याला लपवून लष्करानेच पाकिस्तानला अडचणीत टाकले होते, याचाही उल्लेख इम्रान खान यांनी केला होता. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख इम्रान खान यांना कायमची अद्दल घडविण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. तसे संकेत मिळू लागल्यानंतर इम्रान खान यांची चलबिचल सुरू झाल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply