पापुआ न्यू गिनी’मध्ये भारताच्या पंतप्रधानांचे जोरदार स्वागत

पोर्ट मोरेस्बी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘पापुआ न्यू गिनी’मध्ये जोरदार स्वागत झाले. पॅसिफिक महासागरातील बेटदेश असलेल्या ‘पापुआ न्यू गिनी’मध्ये या क्षेत्रातील १४ बेटदेशांची भारताबरोबरील बैठक पार पडणार आहे. या बेटदेशांवर आपला प्रभाव वाढवून चीन पॅसिफिक महासागर क्षेत्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. ही बाब या क्षेत्रातील भारताच्या व्यापक हितसंबंधांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पापुआ न्यू गिनीमध्ये होणारी ‘फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन-एफआयपीआयसी’ची बैठक भारतासाठी अतिशय महत्त्वाची ठरते.

पापुआ न्यू गिनी’मध्ये भारताच्या पंतप्रधानांचे जोरदार स्वागतआत्तापर्यंत सूर्यास्तानंतर ‘पापुआ न्यू गिनी’मध्ये कुणाचेही स्वागत करण्याची परंपरा नाही. पण भारताच्या पंतप्रधानांसाठी अपवाद करून त्यांचे ‘पापुआ न्यू गिनी’मध्ये जोरदार स्वागत करण्यात झाले. या देशाचे पंतप्रधान जेम्स मरापे यासाठी विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी १९ तोफांची सलामीही यावेळी देण्यात आली. पॅसिफिक महासागर क्षेत्रातील बेटदेश असलेल्या ‘पापुआ न्यू गिनी’मध्ये भारताच्या पंतप्रधानांचे अशारितीने जंगी स्वागत झाले, याला फार मोठे धोरणात्मक महत्त्व असल्याची बाब लक्षात आणून दिली जाते.

‘पापुआ न्यू गिनी’वर प्रभाव टाकण्यासाठी चीनने फार आधीपासूनच हालचाली सुरू केल्या होत्या. चीनच्या या प्रयत्नांना प्रारंभिक यश देखील मिळाले होते. मात्र चीनची गुंतवणूक व चीनबरोबरील आर्थिक सहकार्याचे लाभ मिळण्यापेक्षा त्यामुळे होणारी हानी अधिक असते, याची जाणीव सर्वच देशांना झालेली आहे. ‘पापुआ न्यू गिनी’ देखील याला अपवाद नाही. विशेषतः अमेरिका व ऑस्ट्रेलियासारख्या देशांविरोधात तळ म्हणून पॅसिफिक महासागरातील बेटदेशांचा वापर करण्याची चीनची योजना लक्षात आल्यानंतर, या बेटदेशांनी त्याविरोधात हालचाली सुरू केल्या आहेत.

अशा काळात भारताने देखील ‘पापुआ न्यू गिनी’सह या क्षेत्रातील १४ बेटदेशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याची तयारी केली. यानुसार २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिजी दौऱ्यात ‘फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन-एफआयपीआयसी’ची स्थापना करण्यात आली होती. यामुळे भारत केवळ हिंदी महासागर क्षेत्रापुरता विचार करणारा देश नाही, हा संदेश सर्वांना मिळाला होता.

सोमवारी याची बैठक पापुआ न्यू गिनीमध्ये पार पडेल. धोरणात्मकदृष्ट्या भारताचे एफआयपीआयसीबरोबरील हे सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते. अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया भारताच्या या क्षेत्रातील गुंतवणुकीचे स्वागत करीत आहेत. फार आधीपासूनच या तिन्ही देशांनी चीनचा इथला प्रभाव रोखून वर्चस्ववादी कारवाया थांबविण्यासाठी भारताने व्यापक भूमिका स्वीकारावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे चीनचा अपवाद वगळता या क्षेत्रातील इतर देश भारताच्या इथल्या बेटदेशांबरोबरील सहकार्याचे स्वागतच करीत आहेत. मात्र चीन यामुळे कमालीचा अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील पापुआ न्यू गिनीला भेट देणार होते. त्यांच्या या भेटीविरोधात चीनने इशारेही दिले होते. पण काही कारणास्तव राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा हा दौरा रद्द झाल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या पापुआ न्यू गिनी दौऱ्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

हिंदी English

 

leave a reply