सरकार वाचविण्यासाठी इम्रान खान यांची पाकिस्तानी जनतेला चिथावणी

इस्लामाबाद – अमेरिकेसाठी पाकिस्तानने बरेच काही केले. पण त्याची जाणीव ठेवण्याच्या ऐवजी अमेरिकेने पाकिस्तानचा विश्‍वासघातच केला. आता अमेरिका पाकिस्तानचे लोकनियुक्त सरकार उलथण्याची तयारी करीत आहे. पाकिस्तानातील भ्रष्ट नेते या कटात सहभागी झाले आहेत, असा आरोप पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. राष्ट्रीय वाहिनीवरून देशाला संबोधित करून इम्रान खान यांनी ही गंभीर आरोपांची फैर झाडली आहे. अफगाणिस्तानातील युद्धात अमेरिकेला सहकार्य करण्यास नकार दिल्यानेच, आपल्या सरकारविरोधात हे कारस्थान आखण्यात आल्याचा दावा इम्रान खान यांनी यावेळी केला.

सरकार वाचविण्यासाठीपाकिस्तानचे लष्कर इम्रान खान यांच्या पूर्णपणे विरोधात गेले आहे. त्यांच्या सरकारला पाठिंबा देणार्‍या काही राजकीय पक्षांनी पाठिंबा मागे घेतला आहे. मंत्रिमंडळातील सहकारी देखील राजीनामा देऊन इम्रान खान यांच्यापासून फारकत घेतली आहे. अशा परिस्थिती इम्रान खान यांनी राजधानी इस्लामाबादमध्ये मोठी सभा आयोजित करून आपल्या विरोधात आंतरराष्ट्रीय कट आखण्यात आल्याचा दावा केला. पाकिस्तानचे भ्रष्ट व अमेरिकेसमोर मान तुकवणारे नेते या कटात सहभागी झाले आहेत. असे भ्रष्ट नेते पाकिस्तानच्या सत्तेवर असणे ही अमेरिका आणि इतर परकीय शक्तींच्या हिताची बाब ठरते, असे सांगून इम्रान खान यांनी आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे असल्याची बाब ठासून सांगितली. प्रमाणिकपणा व देशहिताचे निर्णय घेण्यामुळेच आपल्यावर ही वेळ ओढावल्याचा दावा त्यांनी केला.

अशा परिस्थितीत रविवारी, ३ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या संसदेत होणार्‍या अविश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानात कोण कुणाच्या बाजूने उभे राहत आहे, हे पाकिस्तानी जनतेने पहावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले. पाकिस्तानातील गद्दारांमुळे आपले सरकार धोक्यात आलेले आहे. पण मी या आंतरराष्ट्रीय कटाच्या विरोधात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढेन, असे इम्रान खान म्हणाले.

आपल्या देशाविरोधात होणार्‍या या गद्दारीची पाकिस्तानी जनतेने दखल घ्यावी, असे सांगून जनता आपल्याला साथ देईल, असा विश्‍वास इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply