उत्तर कोरियाबरोबरच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण कोरियाकडून रॉकेटची चाचणी

रॉकेटची चाचणीसेऊल – दक्षिण कोरियाने बुधवारी ‘सॉलिड फ्युअल’च्या सहाय्याने रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. अंतराळातील टेहळणी क्षमतेत वाढ करण्यासाठी दक्षिण कोरियाचे प्रयत्न सुरू आहेत. सदर चाचणी याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचा दावा केला जातो. गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यामुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दक्षिण कोरियाने ही रॉकेट चाचणी घेतल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

सहा दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. २०१७ साली लष्करी संचलनात हे क्षेपणास्त्र जगासमोर आणल्यानंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाने या क्षेपणास्त्राची चाचणी केली. अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरांनाही टप्प्यात घेणार्‍या या क्षेपणास्त्र चाचणीमुळे कोरियन क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता. या चाचणीद्वारे उत्तर कोरियाने अमेरिकेसह दक्षिण कोरिया आणि जपान यांना धमकावल्याचा दावा माध्यमांनी केला होता.

रॉकेटची चाचणीयाला एक आठवडाही उलटत नाही तोच शेजारी देश दक्षिण कोरियाने बुधवारी रॉकेटची चाचणी केली. या चाचणीद्वारे दक्षिण कोरियाने रॉकेटबरोबर डमी अर्थात बनावट सॅटेलाईट प्रक्षेपित केले. ही पूर्ण चाचणी यशस्वी पार पडल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. यामुळे येत्या काळात दक्षिण कोरियाची अंतराळातील टेहळणी अधिक भक्कम होईल, असा दावा कोरियन संरक्षण मंत्रालयाने केला.

त्याचबरोबर आत्तापर्यंत उत्तर कोरियाच्या लष्करी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेच्या सॅटेलाईट्सवरील अवलंबित्व कमी होईल, असे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. सध्या दक्षिण कोरियाचे स्वत:चे लष्करी टेहळणी सॅटेलाईट नाही. १९७९ सालच्या करारानुसार दक्षिण कोरिया प्रगत व दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान विकसित करू शकत नाही किंवा त्यांची खरेदी करू शकत नाही. पण २०२० साली दक्षिण कोरियाने तत्कालिन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाबरोबर ‘सॉलिड फ्युअल’च्या खरेदीचा करार केला होता. त्यामुळे दक्षिण कोरियाला हे रॉकेट प्रक्षेपित करणे सोपे बनले आहे.

leave a reply