तैवानविरोधातील युद्धात चीन तैवानच्या तायचुंग बंदरावर पहिला हल्ला चढवेल

- अमेरिकी अभ्यासगटाचा इशारा

वॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग – चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ तैवानविरोधातील युद्धात तायचुंग बंदरावर पहिला हल्ला चढवेल, असा इशारा अमेरिकी अभ्यासगट ‘प्रोजेक्ट 2049’ने दिला आहे. ‘प्रोजेक्ट 2049’चे वरिष्ठ संचालक इयान स्टोन यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला असून चीन तैवानच्या बंदरांना आपले पहिले लक्ष्य बनवेल, असे बजावले आहे. तायचुंग बंदर तैवानमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर असून चीनच्या संरक्षणदलांनी आखलेल्या ‘अ‍ॅम्फिबियस वॉरफेअर’साठी मोक्याची जागा ठरु शकते, असे स्टोन यांनी म्हटले आहे.

तैवानविरोधातील युद्धात चीन तैवानच्या तायचुंग बंदरावर पहिला हल्ला चढवेल- अमेरिकी अभ्यासगटाचा इशारास्टोन यांनी ‘होस्टाईल हार्बर्स: तैवान्स पोर्टस् अ‍ॅण्ड पीएलए इन्व्हॅजन प्लॅन्स’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात चीनने 1993 सालापासूनच तैवानवर हल्ल्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनच्या संरक्षणदलांच्या धोरणात तैवानचा उल्लेख ‘मेन स्ट्रॅटेजिक डायरेक्शन’ असा असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. 2016 साली चीनने आपल्या दोन शिपिंग कंपन्यांचे विलिनीकरण करणे व 2017 साली आणलेला ‘नॅशनल डिफेन्स ट्रान्सपोर्टेशन लॉ’ तैवानविरोधातील हल्ल्याची पार्श्‍वभूमी तयार करणारी पावले होती, असे स्टोन यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

तैवान अनेक छोट्यामोठ्या बेटांनी बनलेला देश असून या बेटांवर चीन हल्ले चढविल, अशा प्रकारचे दावे यापूर्वी विविध विश्‍लेषकांनी केले होते. मात्र स्टोन यांनी ते खोडून काढत चीनने आखलेल्या योजनांनुसार, तैवानच्या बंदरांना सर्वाधिक धोका आहे, असे म्हंटले आहे. तैवानची भौगोलिक स्थिती व संरक्षणसिद्धता लक्षात घेता छोटी बेटे तसेच चौपाट्यांवर हल्ले करणे चीनच्या संरक्षणदलांसाठी लाभदायक ठरणार नाही, याकडे स्टोन यांनी लक्ष वेधले. तैवानवरील हल्ल्यात चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ किमान 13 ते कमाल 22 लाखांपर्यंत जवान उतरवू शकते, असा दावाही अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालात करण्यात आला.

इतक्या मोठ्या प्रमाणात जवान उतरविण्याबरोबरच रणगाडे, सशस्त्र वाहने, युद्धनौका व इतर जहाजे आणि प्रचंड प्रमाणातील सामुग्री उतरविण्यासाठी तैवानची छोटी बेट व चौपाट्या अडचणीच्या ठरतील. त्यामुळे मोठे क्षेत्रफळ असलेले विकसित बंदर हल्ल्याचे लक्ष्य ठरु शकते, असा दावा इयान स्टोन यांनी केला. तायचुंग बंदराभोवतीचा परिसर मोकळा व मैदानी प्रकारातील असून सामरिकदृष्ट्या चीनला त्याचा मोठा फायदा मिळू शकतो, असा दावा अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालात करण्यात आला आहे. तायचुंगबरोबरच काओहसिउंग व अन्पिंग ही बंदरेदेखील चीनच्या हल्ल्याचे प्राथमिक लक्ष्य ठरु शकतात, असे स्टोन यांनी म्हंटले आहे.तैवानविरोधातील युद्धात चीन तैवानच्या तायचुंग बंदरावर पहिला हल्ला चढवेल- अमेरिकी अभ्यासगटाचा इशारा

तैवानमधील आघाडीचे विश्‍लेषक त्झु-युन सू यांनीही अमेरिकी अभ्यासगटाच्या इशार्‍याला दुजोरा दिला आहे. तायचुंग बंदरापासून तैवानमधील दोन महत्त्वाचे संरक्षणतळ जवळच्या अंतरावर असल्याकडे लक्ष वेधले आहे. त्याचवेळी तायचुंग अथवा इतर नजिकच्या बंदरांमध्ये तैवानी संरक्षणदल ‘अ‍ॅण्टी अ‍ॅम्फिबियस वॉरफेअर’चा वापर करु शकणार नाही, असा दावाही सू यांनी केला.

गेल्याच महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून आक्रमक शब्दात इशारा दिला होता. तैवानचा मुद्दा चीनची कम्युनिस्ट राजवट कधीही सोडणार नाही, असे जिनपिंग यांनी बजावले होते. जिनपिंग यांच्या या इशार्‍यापूर्वी, चीनने तैवानच्या सामुद्रधुनीसह ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात तब्बल दीडशे ‘स्टेल्थ’ लढाऊ विमाने तैनात केल्याचे समोर आले होते. चीनच्या संरक्षणदलांनी तैवानच्या क्षेत्रातील हालचाली वाढविल्या असून युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमानांकडून सातत्याने धडका मारणे सुरू आहे. चीनने तैवानवरील आक्रमणाची रंगीत तालीम म्हणून ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धसराव केल्याचेही समोर आले आहे.

leave a reply