भारत आणि भूतानमधील नव्या व्यापारी मार्गाचे उद्‌घाटन

नवी दिल्ली – भारत आणि भूतानमध्ये नवा व्यापारी मार्ग सुरु झाला आहे. पश्चिम बंगालच्या जाईगावपासून ते भूतानच्या पासाखापर्यंत हा मार्ग जोडलेला आहे. यामुळे भारत आणि भूतानचा व्यापार सुरळीत होईल. चीनने नुकताच भूतानच्या भूभागावर दावा केला होता. भारतावर दडपण वाढविण्यासाठी चीन भुतानबरोबर नवा सीमावाद उकरून काढत असताना भारत आणि भूतानमधील हा नवा व्यापारी मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

सध्या पश्चिम बंगालच्या जाईगावपासून भूतानच्या आल्हयपर्यंत व्यापारी मार्ग आहे. बुधवारी भारत आणि भूतानमधील नव्या व्यापारी मार्गाचा उद्‌घाटन सोहळा पार पडला. पश्चिम बंगालच्या जाईगावपासून सुरु होणारा हा मार्ग भूतानच्या पासाखापर्यंत आहे. भूतानमधील पासाखा औद्योगिक केंद्र आहे. या नव्या मार्गामुळे या औद्योगिक नगरीपर्यंत भारतातून कच्चा माल निर्यात होऊ शकेल.

भारत भूतानला खनिजे, धातू, इलेक्ट्रिक वस्तू, वाहने आणि भाज्या निर्यात करतो. तर भूतान भारताला वीज, सिमेंट, लाकडी वस्तू, बटाटे आणि इतर भाज्या आयात करतो. भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी सहकारी देश आहे. २०१८ साली भारत आणि भूतानमधील द्विपक्षीय व्यापार ९२२७ कोटी रुपयांवर पोहोचला होता. या नव्या मार्गामुळे भारत आणि भूतानमधील व्यापाराला अधिक चालना मिळेल. तसेच यामुळे दळणवळण वाढेल, असा विश्वास भूतानमधील भारताच्या राजदूतांनी व्यक्त करण्यात आला आहे.

leave a reply