भारताने संरक्षण साहित्याच्या खरेदीचा वेग वाढविला

India-Israelनवी दिल्ली – इस्रायलच्या दोन अतिप्रगत असॉल्ट रायफल्सची निर्मिती लवकरच भारतात होणार आहे. सीमेवरील संघर्षाबरोबरच दहशतवाद आणि नक्षलविरोधी संघर्षातही या अतिप्रगत रायफल्स अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. याखेरीज भारत इस्रायलकडून ‘स्पाईक फायरफ्लाय’ या कामाकाझी ड्रोन्सची खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारत अमेरिकेकडूनही ‘रॅवेन’ ड्रोन्सच्या खरेदीच्या तयारीत आहे. काही तासांपूर्वीच भारतीय लष्कराने अमेरिकेकडून ७२ हजार अतिरिक्त ‘सिग ७१६ असॉल्ट रायफल्सची खरेदी करणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. चीनबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने अमेरिका, इस्रायली या आपल्या मित्रदेशांकडून संरक्षण साहित्यांच्या खरेदीचा वेग वाढविल्याचे दिसत आहे.

गलवान व्हॅलीतील चीनबरोबरच्या संघर्षानंतर भारताने आपल्या लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि संरक्षण साहित्यांनी सुसज्ज करण्याची झपाट्याने पावले उचलली आहेत. याअंतर्गत भारताने रशियाकडून लढाऊ विमाने आणि हवाई सुरक्षा यंत्रणेच्या खरेदीचा वेग वाढविला आहे. अमेरिकेकडून ७२ हजार अतिरिक्त असॉल्ट रायफल्सच्या खरेदीचा निर्णय देखील याच तयारीचा भाग मानला जातो. भारतीय लष्कराबरोबरच नौदल, वायुसेना आणि निमलष्करीदलाच्या सज्जतेत कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये, यासाठी भारत ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत इस्रायलच्या अतिप्रगत असॉल्ट रायफल्सची निर्मिती करणार आहे.

India-Israelभारताच्या ‘पुंज लॉईड’ आणि इस्रायलच्या ‘इस्रायल वेपन्स सिस्टिम’ यांच्या मध्यप्रदेशमधील कारखान्यात ‘एराड’ आणि ‘कार्मेल’ या दोन असॉल्ट रायफल्सची निर्मिती केली जाईल. याआधीच सदर कारखान्यात इस्रायलच्याच ‘तॅव्होर’ असॉल्ट रायफल्सचे उत्पादन केले जात होते. त्यामुळे एराड आणि कार्मेल रायफल्सची निर्मिती वेगाने होईल, असा दावा केला जातो. तसेच भारतीय लष्कर इस्रायलकडून ‘स्पाईक फायरफ्लाय’ या ड्रोन्सची खरेदी करणार आहे.

शत्रूच्या ठिकाणाचा शोध घेण्यापासून त्यावर हल्ले चढविण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर हे ड्रोन आत्मघाती हल्लेखोराप्रमाणे देखील काम करू शकते. त्यामुळे या बहुउद्देशीय ड्रोनचा भारतीय लष्करातील समावेश महत्त्वाचा ठरणार आहे. तर सीमाभागातील टेहळणीसाठी भारतीय लष्कर अमेरिकेकडून रॅवेन या अतिप्रगत ड्रोन्सची खरेदी करणार आहे. याव्यतिरीक्त फ्रान्सकडून खरेदी केलेल्या रफायल लढाऊ विमानांचा ताफाही या महिनाअखेरीस भारतात दाखल होत आहे.

leave a reply