सीमावादावर भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा

नवी दिल्ली – मंगळवारपासून भारत आणि चीनच्या लष्करामध्ये सीमावादावर नव्याने चर्चा सुरू होत आहे. या चर्चेच्याआधी चीनने गलवान व्हॅली तसेच पँगॉन्ग त्सो’मधून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, यावेळी चर्चेत भारत चीनकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांचे नकाशे मागणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. आत्तापर्यंत या चर्चेत चीनने ही बाब धूर्तपणे टाळली होती. पण भारतीय लष्कर यावेळच्या चर्चेत या मुद्यावर आग्रही राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

India-Chinaगलवान व्हॅलीतील संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह वीस सैनिक शहीद झाल्यानंतर साऱ्या भारतात चीनच्याविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली होती. भारताचा विश्वासघात करुन हल्ला चढविणाऱ्या चीनवर कडक कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता करीत आहे. याआधीही भारतात चीनच्या विरोधात सूर घुमले होते. पण कालांतराने ते शांत झाले. चिनी उत्पादने भारतीय बाजारपेठेत दाखल होतच राहिली, यावेळीही तसेच होईल, असा समज चीनने करुन घेतला होता. पण लष्करी, आर्थिक आणि सामाजिक अशा तीनही पातळ्यांवर भारताचा प्रतिसाद गृहित धरण्याची घोडचूक आपण केलेली आहे, याची जाणीव चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला झालेली आहे. म्हणूनच चीनने सीमावादाबाबत सध्या नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.

आधीच्या काळात भारतीय ग्राहकांना चिनी उत्पादनांखेरीज पर्याय नसल्याचे सांगणारे चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने आता सहकार्याची भाषा सुरू केली आहे. चीनचे लष्करी सामर्थ्य भारतापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचा दावा करणारा ग्लोबल टाईम्स आता संघर्षाने कुणाचेही भले होणार नाही, असे सांगू लागला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालय आणि राजनैतिक अधिकारी मैत्रीपूर्ण संबंधांचे हवाले देऊन वाटाघाटीने सीमावाद सोडविण्याचे आवाहन करीत आहेत. चीनच्या भूमिकेत झालेला हा बदल लष्करी, आर्थिक आणि धोरणात्मक पातळीवर भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयांमुळेच आला आहे. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे साऱ्या जगात चीनविरोधात असंतोष आहे. जगभरातील प्रमुख देश मिळून चीनच्या विरोधात कारवाईची तयारी करीत आहेत. अमेरिकेने आपल्या मित्रदेशांसह चीनवरील लष्करी दडपण वाढविले आहे. त्याचवेळी अमेरिकेने चीनची आर्थिक व राजकीय कोंडी करण्याची सुरुवात केली आहे.

यामुळे चीन जेरीस आलेला आहे. अशा परिस्थितीत भारताबरोबरील सीमावादात आक्रमक भूमिका घेणे चीनला परवडणारे नाही. यासाठी चीन सध्या सामोपचाराने सीमावाद सोडविण्याची भाषा बोलत आहे. मात्र, परिस्थिती बदलली की चीन पुन्हा भारताचा भूभाग बळकाविण्याचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही, याची जाणीव भारताला झालेली आहे. म्हणूनच सीमावादाबाबत चीनची निर्णायक भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी भारताकडून सुरू झाली आहे. चीन अरुणाचल प्रदेशपासून लडाखपर्यंतच्या भारतीय भूभागावर आपला अधिकार सांगत आला आहे. मात्र, आता हे दावे पुढे रेटणे चीनसाठी अवघड जाईल. भारताला बेसावध ठेवून भूमी बळकावत राहण्याचे तंत्र यापुढे कामी येणार नही व भारत आपल्या लष्करी दडपणाचीही पर्वा करणार नाही, याची कल्पना आलेला चीन सध्या तरी भारतातील आपली बाजारपेठ वाचविण्यासाठी सर्वाधिक धडपड करीत आहे. यामुळे भारताच्या मागणीवर सध्यातरी चीन कुठलीही स्पष्ट भूमिका घेण्याची शक्यता दृष्टिपथात नाही.

leave a reply