लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकले

नवी दिल्ली – जगात सर्वाधिक वेगाने लसीकरण भारतात झाले असून आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणाच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. भारतात लस उपलब्ध होण्याच्या महिनाभरआधी अमेरिकेत लसीकरणाला सुरूवात झाली होती. अमेरिकेत आतापर्यंत लसीचे 32.33 कोटी डोस तेथील नागरिकांना देण्यात आले आहेत. तेच भारतात सोमवार सकाळपर्यंत एकूण 32.36 कोटी लसींचे डोस देण्यात आले. 21 जून रोजी नव्या धोरणानुसार देशभरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात झाली, त्यानंतर आठवड्याभरातच सुमारे चार कोटी जणांचे लसीकरण झाले आहे.

भारताने अमेरिकेला मागे टाकलेलसीकरणाच्या वेगाच्या बाबतीत भारताने सर्व देशांना मागे टाकले असून सिंगापूरच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्येला एका दिवसात भारतात लसींचे डोस दिले जात आहेत. आठवडाभरापूर्वी केंद्र सरकारने नव्या धोरणानुसार देशभरात लसीकरण हाती घेतले. यानुसार केंद्र सरकारच आता 18 ते 44 वर्ष वायोगटातील नागरिकांसाठी राज्यांना मोफत लस पुरवित आहे. यासाठी एकूण उत्पादनाच्या 75 टक्के लसींचे खरेदी केंेद्र सरकारकडून केली जात असून 25 टक्के लसी या खाजगी रुग्णालयांना बाजारभावाने खरेदीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. खाजगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत आहे.

या नव्या लसीकरण धोरणाच्या आठवडाभराच्या कालावधीत लसीकरणाने प्रचंड वेग पकडला आहे. 21 जून रोजी या नव्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 88 लाख जणांचे लसीकरण झाले होते. तर त्यानंतर सरासरी 60 लाख जणांचे लसीकरण दरदिवशी होत आहे. आठवडाभरात 3 कोटी 91 लाख जणांना लसीचे डोस देण्यात आले. आठवडाभरात झालेल्या लसीकरणाची ही संख्या कॅनडा, मलेशिया, सौदी अरेबियासारख्या इतर देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ही बाब केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने अधोरेखित केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या संदेशात देशातील लसीकरण मोहिमेला गतीमान करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

भारताने अमेरिकेला मागे टाकलेअमेरिकेत आतापर्यंत लसींचे 32 कोटी 33 लाख 27 हजार डोस देण्यात आले आहेत. तेच भारतात सोमवारच्या सकाळपर्यंत आतापर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजाराहून अधिक डोस देण्यात आले. सोमवारी दिवसभरातही 55 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारतात नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींच्या डोसची संख्या सुमारे 34 कोटींजवळ पोहोचली आहे. भारत आणि अमेरिकेनंतर सर्वाधिक लसीकरण ब्रिटनमध्ये झाले असून ब्रिटनमध्ये 7 कोटी 67 लाख 74 हजार जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर जर्मनीमध्ये 7.14 कोटी जणांना, फ्रान्समध्ये 5.25 कोटी जणांना, इटलीमध्ये 4.96 कोटी जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या बाबतीत हे युरोपिय देश भारताच्या कितीतरी मागे आहेत.

दरम्यान, 16 जानेवारी रोजी भारतात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या सहाय्याने लसीकरण सुरू झाले होते. सर्वप्रथम डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत 1 कोटी 1 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर 72 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. 1.74 कोटी फ्रन्टलाईन्स वर्कर्सना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर सुमारे 34 लाख जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

18 ते 44 वयोगटातील 8.46 कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तेच 19 लाख जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. 45 ते 59 वयोगटादरम्यानच्या 8.71 कोटी जणांना पहिला डोस, तर 1.48 कोटी जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे 6.75 आणि 2.34 कोटी इतके आहे.

leave a reply