इराक, सिरियातील इराणसंलग्न गटांवर अमेरिकेचे हवाई हल्ले

इराणसंलग्नवॉशिंग्टन – गेल्या तीन महिन्यांपासून इराकमधील अमेरिकी जवान, लष्करी तळ आणि दूतावासांवर झालेल्या ड्रोन व रॉकेट हल्ल्यांना अमेरिकेने प्रत्युत्तर दिले. अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य करणार्‍या इराक आणि सिरियातील इराण संलग्न दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविल्याची घोषणा पेंटॅगॉनने केली आहे. यानंतर इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने अमेरिकेच्या या हल्ल्यांना उत्तर देण्याची धमकी दिली. तर हे हल्ले म्हणजे इराकच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन असल्याची टीका इराकच्या सरकारने केली आहे.

पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय इराक आणि सिरियातील या हल्ल्यांची माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशावरुन ही कारवाई केल्याचे किरबाय म्हणाले. रविवारी संध्याकाळी सिरियातील दोन तर इराकमधील एका ठिकाणावर हल्ले चढविले. अमेरिकेच्या एफ-15 आणि एफ-16 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली. या हल्ल्यात इराक-सिरियातील इराणसंलग्न दहशतवाद्यांचा तळ तसेच शस्त्रास्त्रांची कोठारे लक्ष्य करण्यात आली. इराकमधील अमेरिकेचे जवान, लष्करी-हवाई तळ तसेच दूतावासांजवळ झालेल्या ड्रोन्सच्या हल्ल्यांसाठी कतैब हिजबुल्लाह व कतैब सईद अल-शुदा या इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी या तीन ठिकाणांचा वापर केला होता. म्हणून अमेरिकेने इथे हल्ले चढविल्याचे किरबाय म्हणाले.

इराणसंलग्नआंतरराष्ट्रीय आणि अमेरिकेच्या नियमांनुसार, ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर आणि आवश्यक होती, असे किरबाय यांनी माध्यमांना सांगितले. या हल्ल्यात किती जण ठार झाले, याचे तपशील किरबाय यांनी जाहीर केलेले नाहीत. पण या हवाई कारवाईत इराण संलग्न दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओतून तसे स्पष्ट होत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधांवर ड्रोन्स व रॉकेटचे 43 हल्ले झाले. एप्रिल महिन्यापासूनच इराकमधील अमेरिकेच्या तळांवर पाचवेळा ड्रोन हल्ले झाल्याचा आरोप पेंटॅगॉन करीत आहे. इराक आणि सिरियातील दहशतवादी संघटनांवर हल्ले चढवून बायडेन प्रशासनाने इराणला इशारा दिल्याचा दावा केला जातो.

या हल्ल्यानंतर कतैबच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली. इराकमध्ये अमेरिकेचे अडीच हजार जवान त्याचबरोबर लष्करी तळांवर खासगी कंत्राटदार देखील आहेत. अमेरिकेने आपल्या जवानांसह इराकमधून काढता पाय घ्यावा, अशी मागणी इराकमधील इराणसंलग्न नेते व सशस्त्र संघटना करीत आहेत. पण अफगाणिस्तानपाठोपाठ अमेरिकेने इराकमधूनही माघार घेतली, तर या क्षेत्रात मोठी पोकळीक निर्माण होईल व त्याचा फायदा इराणसंलग्न दहशतवादी संघटना घेतील, असा इशारा अमेरिकेच्या सेंटकॉमच्या प्रमुखांनी काही आठवड्यांपूर्वीच दिला होता.

leave a reply