मतभेद बाजूला सारून भारत-रशियाने धोरणात्मक सहकार्य दृढ करण्याचा निर्णय घेतला

- हॉंगकॉंगस्थित वर्तमानपत्राचा दावा

नवी दिल्ली – अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्याने वाढलेला धोका, मध्य आशियाई देशांवरील चीनचा प्रभाव व अमेरिकेच्या या क्षेत्रातील कारवाया, या तीन मुद्यांवर आपले हितसंबंध एकसमान असल्याची जाणीव भारत आणि रशियाला झालेली आहे. यामुळेच आधीच्या काळातील मतभेद बाजूला सारून दोन्ही देश पुन्हा भक्कम सहकार्य प्रस्थापित करीत आहेत, असा दावा हॉंगकॉंगस्थित ‘द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारतभेटीत उभय देशांच्या सहकार्याचे नवे पर्व सुरू झाल्याचे या दैनिकाने म्हटले आहे.

मतभेद बाजूला सारून भारत-रशियाने धोरणात्मक सहकार्य दृढ करण्याचा निर्णय घेतला - हॉंगकॉंगस्थित वर्तमानपत्राचा दावाभारताचा क्वाडमधील समावेश व अमेरिकेबरोबरील भारताची वाढती जवळीक, यामुळे अस्वस्थ झालेल्या रशियाने आपला असंतोष वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त केला होता. गेल्या वर्षीभारताच्या भेटीवर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह पाकिस्तानातही गेले होते. तर भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या रशिया दौर्‍यानंतर जॉर्जियाला भेट देऊन याला प्रत्युत्तर दिले होते. इतकेच नाही तर अफगाणिस्तानविषयक परिषदेचे आयोजन करणार्‍या रशियाने यापासून भारताला दूर ठेवले होते. अशारितीने दोन्ही देशांमध्ये दुरावा वाढत असताना, आपले हितसंबंध जपण्यासाठी भारत व रशियाला एकमेकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याची जाणीव उभय देशांना झाली, असा दावा या दैनिकातील वृत्तात करण्यात आला.

अफगाणिस्तानातील आपल्या हितसंबंधांसाठी रशियाने पाकिस्तानला हाताशी धरले होते. तालिबान आता पूर्वीसारखी राहिलेली नसून यावेळी तालिबानचे वर्तन वेगळे असेल, असे पाकिस्तानने रशियाला आश्‍वस्त केले होते. पण आधीच्या आणि आत्ताच्या तालिबानमध्ये काडीचाही फरक नाही, ही बाब रशियाने वेळीच ओळखली. यानंतर भारत व मध्य आशियाई देशांच्या सहाय्याने अफगाणिस्तानला आपल्या विरोधात जाण्यापासून रोखण्यासाठी रशियाने हालचाली सुरू केल्या. इतकेच नाही तर मध्य आशियाई देशांवरील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठीही रशियाला भारताच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

leave a reply