भारत-बांगलादेशचे संबंध दक्षिण आशियासाठी आदर्श आहेत

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘जगात फार कमी देश आहेत ज्यांचे संबंध बंधुत्वाचे व जवळचे आहेत. भारत आणि बांगलादेश संबंध त्यापैकीच आहेत. भारत आणि बांगलादेश या शेजारी देशांचे संबंध दक्षिण आशियासाठी आदर्श आहेत’, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. सोमवारी भारताने बांगलादेशला १० ब्रॉडगेज इंजिन्स दिले. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हा सोहळा पार पडला. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बोलत होते. या पार्श्वभूमीवरच, १९७१ सालच्या युध्दात पाकिस्तानने केलेल्या नरसंहाराबद्दल पाकिस्तानने बांगलादेशची माफी मागावी, असे बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

India-Bangladeshसोमवारी भारताने बांगलादेशला १० इंजिन्स दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी याला हिरवा कंदील दाखविला. यावेळी बांगलादेशच्या बाजूने परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन व रेल्वेमंत्री मोहम्मद इस्लाम उपस्थित होते. यामुळे भारत आणि बांगलादेशमधील कनेक्टिव्हिटी तसेच व्यापार वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. भारताने बांगलादेशला दिलेले हे सहाय्य ‘नेबरहुड फर्स्ट पॉलिसी’चा भाग आहे.

१९९६ सालापासून भारत आणि बांगलादेशमध्ये रेल्वेचे जाळे उभारण्यास सुरुवात झाली होती. १९६५ सालच्या युद्धानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये बंद पडलेले सात रेल्वेमार्ग सुरु करण्यात येत आहेत. यातील चार मार्ग सुरु झाले असून तिघांचे काम सुरु आहे. हे तीन मार्ग भूतान व नेपाळला जोडणार असल्याचे रेल्वेमंत्री गोयल म्हणाले. गेल्या वर्षी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना भारतात आल्या होत्या. त्यावेळी रेल्वे इंजिन्सवर चर्चा पार पडली होती. आतापर्यंत भारताने बांगलादेशला ४२ इंजिन्स व १२० रेल्वे डबे दिले आहेत. हे सहकार्य पुढेही कायम राहील, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला.

India-Bangladeshभारत आणि बांगलादेशमधील हे वाढते सहकार्य दक्षिण आशिया क्षेत्रासाठी आदर्श असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यावेळी म्हणाले. उभय देश आपल्या संबधांची कथा सोनेरी अक्षरात लिहतील, असा विश्वास भारतीय परराष्ट्रमंत्र्यानी यावेळी व्यक्त केला. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत असून बांगलादेशकडून भारताला होत असलेल्या निर्यातीतही आता वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात ४३ टक्क्यांनी वाढली, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी भारताचे बांगलादेशला आर्थिक सहकार्य कायम राहील, असेही एस. जयशंकर यांनी पुढे सांगितले. भारत बांगलादेशमधल्या या वाढत्या सहकार्यामुळे उभय देशांमधील कनेक्टिव्हिटी व व्यापार वाढण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडे जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. बांगलादेशने त्याकडे दुर्लक्ष केले होते. भारतानेही पाकिस्तानला फटकारले होते. त्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला १९७१ सालच्या युद्धात केलेल्या नरसंहाराची आठवण करुन दिली. पाकिस्तानने यासाठी बांगलादेशची माफी मागायला हवी, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी यावेळी बजावले.

leave a reply