भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानी जवान ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराचा एक जवान ठार झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. यानंतर पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी सकाळी देखील या भागात पुन्हा गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांवविरोधात ठोस कारवाई करण्यात येत असतानाच पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ’आयएसआय’कडून या भागात ’पिपल्स अँटी फासिस्ट फ्रंट’ (पीएएफएफ) ही दहशतवादी संघटना उभी केल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानी जवान

सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराकडून पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये गोळीबार आणि मॉर्टर्सचे हल्ले चढवण्यात आले. पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यांना भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले. यात एक पाकिस्तानी जवान ठार झाला, तर आठ जवान जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या ठोस प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी पुन्हा गोळीबार व मॉर्टर्सचे हल्ले चढवून उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

पाकिस्तानने यावर्षी २,७३३ वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन केले आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्याने पाकिस्तान बिथरला असून सीमेवर गोळीबार करणे व दहशतवाद्यांची घुसखोरी वाढविण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून केले जात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचा हा आटापिटा सुरू आहे.

दरम्यान, पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ’आयएसआय’ने जम्मू काश्मीर ‘द रजिस्टेंस फ्रन्ट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेच्या धर्तीवर “पीपल्स अँटी फासिस्ट फ्रंट” (पीएएफएफ) उभारण्यात आली आहे. ‘पीएएफएफ’ या संघटनेने गेल्या आठवड्यात कुलगाममध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. आपली दखल घेण्यासाठी या नव्या संघटनेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओमध्ये मुखवटे घातलेले तीन दहशतवादी होते. व्हिडिओमधील या दहशतवाद्यांच्या हातातील रायफल्स अमेरिकन बनावटीची “एम – ४” असून याचा वापर ’जैश ए मोहम्मद’कडून केला जातो.

leave a reply