भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला

नवी दिल्ली – भारत ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या आकडेवारीनुसार ही घोषणा केली. भारताचा जीडीपी सुमारे ३.५ ट्रिलियन डॉलर्सवर असून ब्रिटनचा जीडीपी ३.२ ट्रिलियन डॉलर्सवर असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिली. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात समाधानाचे वातावरण आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या देशानंतर आता पाचव्या स्थानावर भारत आला असून अवघ्या दहा वर्षांपूर्वी भारताचा जगातील पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमध्येही समावेश नव्हता, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

fifth largest economyभारतीय अर्थव्यवस्थेची ही कामगिरी आश्वासक असली तरी भारत व ब्रिटनच्या जनसंख्येत कमालीची तफावत आहे. त्यामुळे भारताचे दरडोई उत्पन्न केवळ २,५०० डॉलर्स तर ब्रिटनचे दरडोई उत्पन्न ४७ हजार डॉलर्स इतके आहे, ही तफावत विसरून चालणार नाही, असे उद्योगक्षेत्रातील काहीजणांनी बजावले आहे. मात्र काहीही झाले तरी सर्वाधिक विकासदराने प्रगती करीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची ब्रिटनसारख्या देशाला मागे टाकणारी कामगिरी लक्षवेधीच ठरते, असे अर्थतज्ज्ञ व उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्त करीत आहेत. एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनलाच मागे टाकून भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला, ही देशाचा आत्मविश्वास वाढविणारी बाब ठरते, असे उद्योगक्षेत्रातीलच काहीजणांनी म्हटले आहे.

नाणेनिधीकडून ही माहिती दिली जात असतानाच, स्टेट बँक ऑफ इंडियाने भारत २०२७ साली जर्मनी व २०२९ साली जपानलाही मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. स्टेट बँकेच्या प्रमुख आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांच्या या अहवालात भारत पुढच्या पाच वर्षात जर्मनीला व सात वर्षांनी जपानलाही मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा दावा करण्यात आला आहे. या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने १३.५ टक्के इतक्या वेगाने प्रगती केलेली आहे, याचा दाखलाही या अहवालात देण्यात आला आहे.

हा प्रगतीचा वेग कायम राखण्यात देशाला यश मिळाले, तर या वित्तीय वर्षात भारत ६.७ ते ७.७ टक्के पर्यंतचा विकासदर गाठू शकेल. जगभरात दुसऱ्या कुठल्याही प्रमुख देशाकडून या वित्तीय वर्षात अशा स्वरुपाची कामगिरी अपेक्षित नाही. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही झेप लक्षणी बाब ठरते. पण असे असले तरी भारताला बेसावध राहता येणार नाही. कारण जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असून याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर होऊ शकतो, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवरून येत असलेल्या या आत्मविश्वास वाढविणाऱ्या बातम्यांबरोबरच भारताने आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे लक्ष ठेवून सावधपणे पावले उलचण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

leave a reply