रशियाकडून युआनसह इतर परकीय चलनाच्या खरेदीची जोरदार तयारी

-‘ब्लूमबर्ग’ या वेबसाईटचा दावा

yuan from Russiaवॉशिंग्टन/मॉस्को – पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना शह देण्यासाठी रशियाकडून नवनव्या पर्यायांची चाचपणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रशियाने मोठ्या प्रमाणात परकीय चलन खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. रशियावर निर्बंध न लादणाऱ्या देशांचे चलन खरेदी करण्याची योजना असून त्यात चीनच्या युआनसह इतर देशांचा समावेश असेल, असा दावा अमेरिकेतील आघाडीची वेबसाईट ‘ब्लूमबर्ग’ने केला. या वृत्तानंतर चीनच्या युआनसह तुर्कीचे चलन लिरा तसेच भारतीय रुपयाचे मूल्य काही काळाकरता वधारल्याचे वृत्त समोर आले आहे.

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रशियाने गेल्या दशकापासून अमेरिकी डॉलरचा वापर कमी करण्याचे धोरण आखले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाची परकीय गंगाजळी गोठविण्याची कारवाई केली होती. त्यानंतर रशियाने अमेरिकी डॉलरचा वापर कमी करण्याबरोबरच पर्यायी राखीव चलन व पर्यायी पेमेंट सिस्टिम अशा दोन्ही योजनांना वेग दिला होता.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्षांनी सदर गट राखीव आंतरराष्ट्रीय चलन तसेच पर्यायी पेमेंट सिस्टिमवर काम करीत असल्याची उघड घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात रशियन यंत्रणानी भारत, इराण, तुर्की यासारख्या देशांबरोबर चलनाचा वापर तसेच व्यापारी व्यवहारांसंदर्भात करार होत असल्याचे संकेत दिले होते. गेल्या महिन्यात झालेल्या ‘युरेशियन इकॉनॉमिक युनियन’च्या बैठकीत, परस्परांमधील व्यापारी व्यवहारांमध्ये राष्ट्रीय चलनांचा वापर प्रस्तावित करण्यात येत आहे, असेही जाहीर करण्यात आले होते.

russia yuanही पार्श्वभूमी लक्षात घेता रशियाकडून परकीय चलनांच्या खरेदीसंदर्भात देण्यात आलेले संकेत लक्षवेधी ठरतात. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया जवळपास 70 अब्ज डॉलर्स मूल्याचे परकीय चलन खरेदी करणार आहे. यात चीनच्या युआनला प्राधान्य असेल हे स्पष्ट झाले आहे. मात्र इतर चलने कोणती असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यासाठी रशियावर निर्बंध न टाकलेले व मैत्रीपूर्ण संबंध असलेले देश असा निकष ठेवण्यात आला आहे. या निकषाचा विचार करता त्यात ‘ब्रिक्स’ गटातील देशांसह इराण व तुर्कीचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण त्याला ठोस दुजोरा मिळालेला नाही.

परकीय चलनाच्या खरेदीमागे मजबूत झालेले रुबल चलन अमेरिकी डॉलरच्या तुलनेत कमकुवत करणे हादेखील हेतू असल्याचे सांगण्यात येते. सध्या डॉलरमागे 60 रशियन रुबलने व्यवहार सुरू आहेत. परकीय चलनांच्या खरेदीनंतर रुबल 75 ते 80 पर्यंत जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रशियाची मध्यवर्ती बँक व वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी परकीय चलनाच्या खरेदीच्या योजनेला मंजुरी दिल्याचे सांगण्यात येते. मात्र इतर बाबी अजून स्पष्ट व्हायच्या असून त्यानंतरच योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, असे ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले आहे.

leave a reply