कोरोनाच्या लसीचे 20 कोटीहून अधिक डोस देणारा भारत दुसरा देश बनला

नवी दिल्ली – भारताची लोकसंख्या पाहता भारताला मोठ्या प्रमाणावर लसींची आवश्यकता आहे. मात्र त्या तुलनेत उत्पादन कमी होत असल्याने लसीकरणाचा वेग कमी असल्याचे तक्रार होते. असे असले तरी भारतात इतर देशांच्या मानाने वेगाने लसीकरण झाले असून याचे दाखल आकडेवारीच देत आहे. केवळ 130 दिवसात भारतात 20 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले असून असे करणारा भारत अमेरिकेनंतरचा एकमेव देश आहे. ब्रिटनला लसीचे 5.1 कोटी डोस देण्यासाठी 168 दिवस लागले होते. यापेक्षा कितीतरी कमी वेळेत भारताने जवळजवळ चौपट लसीकरण केले आहे.

कोरोनालसीचे 20 कोटीहून अधिक डोस देणारा भारत दुसरा देश बनलाबुधवारी भारताने 20 कोटी लस देण्यााचा टप्पा ओलांडला. देशात आतापर्यंत 20 कोटी 6 लाख 62 हजार 456 लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. यामध्ये 4 कोटी 35 लाख 12 हजार 863 जणांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहेत, तर 15 कोटी 71 लाख 49 हजार 593 जणांना लसीचा एकच डोस मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली.

देशात 45 वर्ष वयोगटातील 34 टक्के नागरिकांना सध्याच्या घडीला लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. तेच 60 वर्षावरील नागरिकांचा विचार केल्यास हेच प्रमाण 42 टक्के आहे, याकडे आरोग्यमंत्रालयाने लक्ष वेधले आहे. 16 जानेवारीला देशात लसीकरणाला सुरूवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात केवळ डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू करण्यात आले, तर मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.

सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींद्वारेच लसीकरण होत असून या लसींचे उत्पादन घेणार्‍या भारत बयोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट सध्या आपली उत्पादन क्षमता वाढवित आहे. जूलैपासून महिन्याला 15 कोटींहून अधिक लस उपलब्ध होऊ लागतील. तसेच इतरही कंपन्यांच्या लसी देशात येतील. त्यामुळे डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करता येईल इतक्या 200 कोटी लसी भारतात उपलब्ध असतील, असे काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्रालयाने म्हटले होते.

दरम्यान, अमेरिकेत लसींचे 20 कोटी डोस देण्यासाठी 124 दिवसांचा कालावधी लागला होता. यानंतर इतक्या कमी दिवसात इतके लसीकरण करणारा भारत एकमेव देश आहे. तेच ब्रिटनला 5.1 कोटी लसीकरणासाठी 168 दिवस, ब्राझिलला 5.9 कोटी लसीकरणासाठी 128 दिवस, जर्मनीला 4.5 कोटी लसीकरणासाठी 149 दिवस लागले आहे.

leave a reply