‘एलएसी’वरील वाटाघाटींदरम्यान ‘लिपुलेख’मध्ये चीनची नवी कुरापत

- परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली – लडाख सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून सैन्य माघारी घेण्याच्या मुद्द्यावर भारत व चीनमध्ये एकमत झाले आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेल्या कराराच्या आधारावर नियंत्रणरेषेवरून सैन्यमाघारीची प्रक्रिया राबविली जाईल असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला असून, दोन्ही बाजूंनी सैन्यमाघारी संदर्भातील प्रक्रियेच्या प्रगतीचा आढावा घेतला असे सांगण्यात आले आहे. एकीकडे लडाख सीमेवरील सैन्यमाघारीची चर्चा सुरू असतानाच चीनने भारत-नेपाळ सीमेवरील ‘लिपुलेख’जवळ लष्करी तैनाती वाढविण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळाले आहेत.

'एलएसी'

चिनी लष्कराच्या चिथावणीखोर कारवायांमुळे गेले काही महिने भारत-चीन नियंत्रणरेषेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी गलवान व्हॅली भागात चीनने विश्वासघात करून भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. त्यावेळी भारतीय लष्कराने जबरदस्त दणका देत चीनला माघार घेण्यास भाग पाडले होते. मात्र त्यानंतर चीनने नियंत्रणरेषेवरील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनातीत सुरुवात केली आहे. यात पॅन्गॉंग लेक, हॉट स्प्रिंग्स, डेप्सांग यासारख्या भागांचा समावेश आहे. चीनच्या या तैनातीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही या भागातील संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणावर वाढविली असून प्रगत लढाऊ विमानांसह ड्रोन्स, रणगाडे, तोफा व अतिरिक्त लष्करी तुकड्या तैनात केल्या आहेत.

संरक्षणतैनाती वाढवतानाच इतर मुद्द्यांवरही भारताने अत्यंत आक्रमक धोरण स्वीकारले असून त्यामुळेच चीन चांगलाच दडपणाखाली आला आहे. गेल्या दोन महिन्यात विविध पातळ्यांवर झालेल्या चर्चेत भारताने चीनच्या सैन्य माघारीचा मुद्दा लावून झाला असून भारत एकतर्फी पाऊल उचलणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे चीनला राजनैतिक पातळीवर सैन्यामाघारीची तयारी दर्शविणे भाग पडल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात १४ तारखेला भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सीमावादावर चर्चा पार पडली होती. त्यानंतर दोन्ही देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर कोणत्याही मोठ्या हालचाली झाल्या नव्हत्या.

'एलएसी'

या पार्श्वभूमीवर, भारत व चीन दरम्यान स्थापन झालेल्या ‘वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड को-ऑर्डिनेशन’च्या(डब्ल्यू एमसीसी) बैठकीत झालेले एकमत महत्त्वाचे ठरते. यामुळे नजीकच्या काळात दोन्ही देशांची सैन्य माघारी प्रत्यक्षात सुरू झालेली दिसेल, असे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत. मात्र प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून सैन्य माघारीची तयारी दाखविणाऱ्या चीनने दुसऱ्या बाजूने भारताची वाद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या काही दिवसात भारत व नेपाळमध्ये वादाचा मुद्दा ठरलेल्या ‘लिपुलेख’नजिक चीनने नवी तैनाती सुरू केल्याचे समोर आले आहे. उत्तराखंड राज्यातील ‘कालापानी व्हॅली’जवळ असणाऱ्या या क्षेत्रात चीनने ‘१५० लाईट कंबाइंड आर्म्स ब्रिगेड’ तैनात केल्याचे उघड झाले.

चीनच्या या आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तयारी सुरू केली आहे. लडाख भागातील लष्करी हालचाली सुलभ व्हाव्यात यासाठी भारताने दोन मोठ्या ‘रोड प्रोजेक्टस्’ला मान्यता दिली आहे. या नव्या रस्त्यांच्या उभारणीमुळे नियंत्रणरेषेवर तैनात लष्करी तुकड्यांना रसद पुरवठा अधिक वेगाने व सहजतेने होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.

leave a reply