अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाला इराणवरील ‘स्‍नॅपबॅक’ निर्बंधांचा नवा इशारा दिला

न्यूयॉर्क – ‘कितीही प्रयत्‍न झाले तरी अमेरिका जागतिक दहशतवादाचा सर्वात मोठा प्रायोजक असणार्‍या इराणला लढाऊ विमाने, रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रसाठा मिळू देणार नाही’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष डियान द्‍जानी यांना इराणवरील ‘स्‍नॅपबॅक’ निर्बंधांची अधिसूचना दिल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही घोषणा केली. रशिया, युरोपिय महासंघाने अमेरिकेच्या या स्‍नॅपबॅक निर्बंधांच्या इशार्‍यावर चिंता व्यक्त केली आहे. तर अमेरिकेचे निर्बंध आपल्याला रोखू शकणार नसल्याचा दावा इराणने केला आहे.

‘स्‍नॅपबॅक’

आठवड्यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने इराणवरील शस्त्रास्त्र निर्बंधांचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला होता. रशिया व चीनने अमेरिकेच्या प्रस्तावावर नकाराधिकार वापरला तर सुरक्षा परिषदेतील अमेरिकेचे मित्रदेश असणारे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यावेळी गैरहजर राहिले होते. सुरक्षा परिषदेच्या या निकालावर संताप व्यक्त करुन अमेरिकेने इराणवर स्‍नॅपबॅक निर्बंध अर्थात सर्वच्यासर्व निर्बंध लादण्याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर स्‍नॅपबॅक निर्बंध लादण्याचे जाहीर केले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी गुरुवारी गुतेरस आणि द्‍जानी यांची भेट घेऊन सदर निर्बंधांची अधिसूचना सुपूर्द केली.

२०१६ साली सुरक्षा परिषदेने मागे घेतलेले इराणवरील सर्व निर्बंध नव्याने लागू करण्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर सुरक्षा परिषदेत प्रस्तावित केलेल्या निर्बंधांना समर्थन न देणार्‍या युरोपिय देशांवर पॉम्पिओ यांनी टीका केली. ‘इराणने अणुकरारातील नियमांचे उल्लंघन करुन ३०० किलोग्रॅमहून अधिक संवर्धित युरेनियमचा साठा केला. तरी देखील अमेरिकेच्या निर्बंधांच्या प्रस्तावाकडे पाठ फिरवून युरोपिय देशांनी आयातुल्लाहंची साथ दिली’, असे ताशेरे पॉम्पिओ यांनी ओढले. तर, काहीही झाले तरी इराणला लढाऊ विमाने, रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रसाठ्यांची खरेदी करु देणार नाही, अशी घोषणा पॉम्पिओ यांनी यावेळी केली.

‘स्‍नॅपबॅक’

इराणवर स्‍नॅपबॅक निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या या तयारीवर रशिया तसेच युरोपिय महासंघाने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे हे स्‍नॅपबॅक यशस्वी होणार नसल्याचा दावा युरोपिय महासंघाने केला. तर रशियाने पुढच्या काही तासात सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच सदर बैठकीत सहभागी होणार नसल्याचे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर इराणवर सर्वच्यासर्व निर्बंध लादण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नसल्याचा दावा इराणने केला आहे.

दरम्यान, अमेरिका इराणवर स्‍नॅपबॅक निर्बंध लादण्याच्या तयारीत असताना इराणने दोन नव्या क्षेपणास्त्रांची निर्मिती केल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या हवाई कारवाईत ठार झालेले इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख जनरल कासेम सुलेमानी आणि कमांडर अबू महदी यांची नावे या दोन्ही क्षेपणास्त्रांना देण्यात आली आहेत. इराणच्या या क्षेपणास्त्रांची निर्मिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांचे उल्लंघन असल्याचा दावा काही माध्यमे करीत आहेत.

leave a reply