भारत-चीन लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा सकारात्मक ठरल्याचे दावे

नवी दिल्‍ली – सोमवारी भारतीय लष्कराच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्‍या प्रदिर्घ चर्चेनंतर चीनने गलवान व्‍हॅली तसेच पँगॉग सरोवराच्‍या क्षेत्रातून संपूर्ण माघार घेण्याची तयारी दाखविली आहे. त्‍यामुळे ही चर्चा सकारात्‍मक ठरल्‍याचे दावे दोन्‍ही बाजूंकडून केले जातात असे असले तरी भारत यावेळीही चीनच्‍या माघारीकडे सावधानतेने पाहत असल्‍याचे संकेत मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर भारताचे लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी लेहला भेट देऊन इथल्‍या हॉस्‍पिटलमध्ये उपचार घेत असलेल्‍या जवानांची विचारपूस केली. भारतीय लष्करी प्रमुखांचा लडाख दौरा भारतीय लष्कराची चीनवर करडी नजर रोखली आहे असा स्‍पष्ट संदेश देत आहे.

भारत-चीन

गलवान व्‍हॅलितील संघर्षाला आठवडा झाल्‍यानंतर दोन्‍ही देशांच्‍या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्‍या चर्चेमध्ये साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. अपेक्षेनुसार चीनच्‍या लष्करी अधिकाऱ्यांनी ताठर भूमिका घेतली होती पण चीनच्‍या लष्कराने माघार घेतल्‍याखेरील सीमेवरील तणाव निवळणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन भारताच्‍या लष्करी अधिकाऱ्यांनी चीनला परिस्‍थितीची जाणीव करून दिली. ११ तासाहून अधिक काळ चाललेल्‍या या चर्चेत अखेरिस चीनने माघार घेण्याची तयारी दाखविली. चीनचे लष्कर इथून काही किलोमीटर मागे जाणार असल्‍याचे वृत्तही प्रसिध्द झाले आहे. तर ही चर्चा सकारात्‍मक ठरल्‍याचा दावा भारताकडून करण्यात येत आहे. असे असले तरी भारतीय लष्कर चीनच्‍या माघारीनंतरही इथल्‍या परिस्‍थितीवर करडी नजर रोखून असल्‍याचे स्‍पष्ट संकेत मिळत आहेत. चीनने नरमायीचे धोरण स्‍वीकारुन माघार घेण्याची तयारी का दाखविली यावर भारतीय माध्यमांमध्ये चर्चाही सुरु झाली आहे.

गलवान व्‍हॅलितील चीनच्‍या हल्‍ल्‍यात भारताचे कर्नल संतोष बाबू यांच्‍यासह २० सैनिक शहिद झाले. यानंतर भारतात संतापाची तीव्र लाट उसळली व भारतीयांनी चीनी उत्‍पादनावर बंदीसाठी व्‍यापक आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची झळ चीनला जाणवू लागली आहे. भारताच्‍या व्‍यापारी संघटनांनीही चीनी उत्‍पादनांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे, तर भारत सरकारने तसेच राज्‍यांच्या सरकारांनी मिळून चीनी कंपन्यांना दिलेली हजारो कोटी रुपयांची कंत्राटे रद्द करून टाकली आहेत. यामुळे हवालदिल झालेल्‍या चीनीकंपन्यांनी राष्ट्राध्यक्ष शि जिंगपिंग यांच्‍याकडे दाद मागितल्‍याचे उघड होत आहे. याचा फार मोठा प्रभाव चीनवर पडला असून करोनाच्‍या फटक्‍यातून बाहेर पडून अर्थव्‍यवस्‍थेचे गाडे पूर्वपदावर आणू पाहणाऱ्या चीनला यावेळी तरी भारताशी वाद घालणे परवडणार नाही याची स्‍पष्ट जाणीव चीनला झालेली आहे. त्‍यातच भारत सरकारने चीनमधून आयात केल्‍या जाणाऱ्या उत्‍पादनावर जबर कर लादण्याची तयारी केल्‍याचेही वृत्त प्रसिध्द झाले होते. यामुळे चीन सीमावादात माघार घेण्याची तयारी करू लागला आहे.

मात्र काहीही झाले तरी भारताचा अनेकवार विश्वासघात करणाऱ्या चीनवर यावेळीही विश्वास ठेवता येणार नाही असे भारतीय सामरिक विश्लेषक पुन्हा पुन्हा बजावत आहेत. म्हणूनच भारताने चीनबाबत सावधानतेचीच भूमिका कायम ठेवावी अशी मागणी या विश्लेषकांकडून केली जात आहे.

leave a reply