भारत, रशिया व चीनच्‍या परराष्ट्रमंत्र्याची त्रिपक्षीय बैठक संपन्न

नवी दिल्‍ली – भारत, रशिया आणि चीनच्‍या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्‍या व्‍हच्‍युअल त्रिपक्षीय चर्चेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनला चांगलेच खडसावले. थेट नामोल्‍लेख टाळून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनचे वर्तन जबाबदार देशासारखे नसल्‍याचा टोला लगावला. त्‍याचवेळी आंतरराष्ट्रीय समुदायाने आजवर भारताला यथोचित स्‍थान दिले नाही व भारतावर अन्याय केला अशा खरमरीत शब्‍दात जयशंकर यांनी भारताची भूमिका या त्रिपक्षीय परिषदेत मांडली.

त्रिपक्षीय बैठक

रशियात आयोजित करण्यात आलेल्‍या व्‍हिक्‍टरी डे परेडसाठी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग रशियात दाखल झाले आहेत. यावेळी चीनचे संरक्षणमंत्रीही रशियात असून त्‍यांनी राजनाथ सिंग यांच्‍याशी चर्चा करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र राजनाथ सिंग यांनी दोन्‍ही देशांच्‍या सिमेवरील तणाव कमी झाल्‍याखेरीज चर्चा करणार नाही असे सांगून ही चर्चा टाळल्‍याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर भारत, रशिया आणि चीन यांच्‍यात परराष्ट्र मंत्र्यांच्या त्रिपक्षीय व्‍हच्‍युअल परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बोलत होते. भारत आणि चीनच्‍या सिमावादाचा थेट उल्‍लेख न करता जयशंकर यांनी चीनला नेमक्‍या शब्‍दात सज्‍जड इशारा दिला.

स्‍वत:ला जगाचे कर्ते धर्ते मानणाऱ्या देशाचे वर्तन आदर्श असायला हवे या देशांनी आंतरराष्ट्रीय नियमाने जबाबदारीचे पालन करायला हवे अशी अपेक्षा यावेळी जयशंकर यानी व्‍यक्त केली. जागतिक महासत्ता असणाऱ्या चीनसाठी जयशंकर यांनी लगावलेला हा टोला अतिशय मर्मभेदी ठरला, याबरोबरच भारताच्‍या परराष्ट्र मंत्र्यांनी आतरराष्ट्रीय समुदायाने आजवर भारताला योग्‍य ते स्‍थान दिले नाही हे परखड शब्‍दात मांडले. फार मोठी आर्थिक शक्ती व अणवस्त्रधारी देश असलेल्‍या भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाने योग्‍य ते स्‍थान दिले नाही. भारताने आतरराष्ट्रीय शांतीसेनेसाठी फार मोठे योगदान दिले याचीही आठवण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली असे असूनही भारताला योग्‍य ते स्‍थान नाकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्‍या धोरणांवर फेरविचार करावा अशी मागणी यावेळी जयशंकर यांनी केली आहे.

चीनबरोबरील सिमावादाचा थेट उल्‍लेख न करता भारताच्‍या परराष्ट्र मंत्र्यांनी अत्‍यंत कुशलतेने या त्रिपक्षीय चर्चेमध्ये भारताची बाजू मांडली. दरम्‍यान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्‍हरोव्‍ह यांनी भारत व चीन आपसातील वाद मिटवण्यासाठी समर्थ असून दुसऱ्या कोणाच्‍याही मध्यस्‍थीची या देशांना आवश्यकता नसल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍याचवेळी भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्‍या शेवटच्‍या परिषदेचे स्‍थायीसदस्‍यत्‍व मिळायला हवे अशी मागणी करून रशियाच्‍या परराष्ट्र मंत्र्यांनी यासाठी भारताला पुन्‍हा एकदा समर्थन जाहिर केले आहे. चीनबरोबरील त्रिपक्षीय चर्चेतच रशियाने भारताच्‍या स्‍थीयी सदस्‍यत्‍वाला पाठिंबा देऊन आपण भारताबरोबरील संबंधाना सर्वाधिक महत्‍व देत असल्‍याचे दाखवून दिले आहे. कायम भारताच्‍या विरोधात भूमिका घेणाऱ्या चीनसाठी हा फार मोठा धक्‍का ठरतो, भारत आणि चीन यांच्‍या वादात रशियाने केवळ तटस्‍थ राहण्याची भूमिका स्‍वीकारली तरीही तो चीनसाठी धक्‍काच ठरेल असे राजनैतिक विश्लेषकांचे म्‍हणणे होते पण रशियाने त्‍याच्याही पुढे जाऊन आपण भारताच्‍या मागे ठामपणे उभे असल्‍याचे चीनला दाखवून दिले आहे.

leave a reply