भारताचे चीनबरोबरील संबंध सुरळीत नाहीत

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

बाणवली – भारत आणि चीनच्या एलएसीवरील परिस्थिती ‘स्टेबल’ अर्थात स्थीर असल्याचे चीनचे परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांनी म्हटले आहे. एससीओच्या बैठकीदरम्यान बोलताना चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताबरोबरील आपल्या देशाचे संबंध सुरळीत असल्याचे दावे देखील केले. ‘पण सीमेवर शांती व सौहार्द प्रस्थापित झाल्याखेरीज भारत व चीनचे संबंध सुरळीत होणार नाहीत. त्यासाठी सीमेवरून लष्कराच्या माघारीची प्रक्रिया पूर्ण करणे भाग आहे’, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चेत आपण हा मुद्दा ठासून मांडल्याची माहिती जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारताचे चीनबरोबरील संबंध सुरळीत नाहीत - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरएससीओच्या बैठकीदरम्यान, भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेदरम्यान चीनच्या परराष्ट्रमंत्री ‘इतिहासापासून अनुभव व धडे घेण्याची’ गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच दोन्ही देशांनी दिर्घकालिन हितसंबंध लक्षात घेऊन आपले धोरणात्मक सहकार्य नव्या उंचीवर न्यावे, अशी अपेक्षाही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याला उत्तर देताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एलएसीवर लष्कराची तैनाती कायम ठेवून संबंध सुरळीत होऊ शकत नाही, याची जाणीव चीनला करून दिली आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील बैठकीत आपण हा मुद्दा मांडला होता व जाहीरपणे देखील आपण तेच सांगत असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जगभरातील सर्वच प्रमुख देश भारताबरोबर आर्थिक तसेच धोरणात्मक पातळीवरील सहकार्य वाढविण्यासाठी आक्रमक प्रयत्न करीत आहेत. भारताची बाजारपेठ मिळविण्यासाठी अमेरिका व युरोपिय देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे अमेरिका व युरोपिय देशांमध्ये लाखो जणांना रोजगार मिळू लागले आहेत. यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढत चालले असून भारताचा रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून उदयाला येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत कित्येक वर्षांपासून भारताच्या व्यापारी औदार्याचा लाभ घेणाऱ्या चीनने ‘गलवान’चा संघर्ष छेडून आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्याचे दिसत आहे. याचा विपरित परिणाम दोन्ही देशांच्या संबधांवर झालेला आहे.

2020 साली गलवानच्या संघर्षानंतर भारताकडून येणाऱ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेण्यात चीनने घोडचूक केली व या संघर्षानंतर भारताला 62 सालच्या युद्धातील पराभवाची आठवण करून दिली होती. यावेळी चीन 1962 सालापेक्षाही भारताला मानहानीकारक पराभव पत्करण्यास भाग पाडेल, असे दावे चीनने ठोकले होते. यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारताने चीनच्या ॲप्स तसेच उत्पादनांवर बंदी टाकून चीनला परिणामांची जाणीव करून दिली. भारतीय उद्योगक्षेत्र देखील चीनवरील आपले अवलंबित्त्व कमी करण्यासाठी वेगाने पावले टाकत आहे.

म्हणूनच सध्या भारत चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात करीत असला, तरी पुढच्या काळात चीनला भारताची बाजारपेठ गमावावी लागेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. या कारणामुळे धास्तावलेला चीन आपले भारताबरोबरील संबंध सुरळीत असल्याचा आभास निर्माण करीत आहे. पण भारताचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री चीनबरोबरील संबंध तणावपूर्ण असल्याचा इशारा देत आहे. लडाखच्या एलएसीवरून चीनने आपले लष्कर पूर्णपणे मागे घेतल्याखेरीज इथे शांती व सौहार्द प्रस्थापित होणार नाही. तसे झाल्याखेरीज दोन्ही देशांचे संबंध सुरळीत होणे शक्यच नाही, असे भारत चीनला बजावत आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी एससीओच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा चीनला याची जाणीव करून दिलेली आहे.

leave a reply