दहशतवादाला अधिकृतता बहाल करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न खपवून घेणार नाही

- भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची चपराक

बाणवली – शुक्रवारी एससीओच्या बैठकीत भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. दहशतवादाच्या मुद्याचा वापर राजनैतिक कुरघोडी व हत्यारासारखा केला जाऊ नये, अशी अपेक्षा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी व्यक्त केली. तसेच पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वात मोठा बळी असल्याचे सांगून बिलावल भुत्तो यांनी सहानुभूती कमावण्याचा प्रयत्न केला. मात्र दहशतवादाचा बळी ठरणारे देश दहशतवाद्यांशी चर्चा करीत नाहीत, असे खणखणीत उत्तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिले. तसेच दहशतवादाचा हत्यारासारखा वापर न करण्याची आवाहन करणारे, दहशतवाद खपवून घ्या, अशी मागणी करून करून त्याला अधिकृतता बहाल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण भारत तसे होऊ देणार नाही, असा टोला जयशंकर यांनी लगावला.

दहशतवादाला अधिकृतता बहाल करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न खपवून घेणार नाही - भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची चपराकदहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करून दहशतवाद्यांचे आर्थिक स्त्रोत खंडीत करण्याचे आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एससीओच्या बैठकीत केले. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी दहशतवादाचा वापर राजनैतिक कुरघोडीसाठी तसेच दुसऱ्याच्या विरोधात राजनैतिक हत्यारासारखा केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपला देश दहशतवादाचा सर्वात मोठा बळी असल्याचेही बिलावल भुत्तो पुढे म्हणाले. याबरोबरच काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने हटविले, त्याचाही उल्लेख पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. या बैठकीत पाकिस्तानकडून काश्मीरचा अशारितीने उल्लेख केला जाईल, अशी दाट शक्यता बऱ्याचजणांनी वर्तविली होती. मात्र भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यावर मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिले.

कलम 370 इतिहासजमा झाले आहे, पाकिस्तानने आता घोर निद्रेतून जागे होण्याची वेळ आलेली आहे. काश्मीरशी पाकिस्तानचा कधीही संबंध नव्हता व यापुढेही नसेल. काश्मीरचा मुद्दा आता पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा अवैध ताबा हा देश कधी सोडतो, इतक्यापुरताच मर्यादित राहिलेला आहे, असे जयशंकर यांनी खडसावले. ‘दहशतवादाच्या मुद्याचा राजनैतिक हत्यारासारखा वापर होऊ नये, अशी मागणी करणारे, दहशतवादी कारवाया सुरू राहिल्या, तरी त्याचा संबंधांवर परिणाम होऊ नये; असे सांगून दहशतवादाला अधिकृतता बहाल करण्याची शिफारस करीत आहेत, याची जाणीव भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. अशारितीने दहशतवाद ही सर्वसामान्य बाब असल्याचा आभास निर्माण करण्यामागे विशिष्ट प्रकारची मानसिकता आहे, यावर बोट ठेवून जयशंकर यांनी दहशतवाद हीच पाकिस्तानची मुलभूत प्रवृत्ती असल्याची बाब लक्षात आणून दिली. तसेच भारत हे कधीही खपवून घेणार नाही, असे सांगून जयशंकर यांनी दोन्ही देशांमध्ये नजिकच्या काळात चर्चा शक्य नसल्याचा संदेश साऱ्या जगाला दिला आहे.

एससीओच्या या बैठकीत पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा शक्य नसल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आधीच जाहीर केले होते. तसे करून भारताने पाकिस्तानला चपराक लगावली आहे. म्हणूनच परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी सदर बैठकीसाठी भारतात जाऊ नये, अशी मागणी पाकिस्तानातील काहीजणांकडून केली जात होती. भारताचे परराष्ट्रमंत्री या बैठकीचे औचित्य साधून पाकिस्तानला दहशतवादावरून धारेवर धरतील व अपमान करतील, अशी चिंता पाकिस्तानी विश्लेषक व्यक्त करीत होते. त्यांची भीती प्रत्यक्षात उतरल्याचे शुक्रवारी एससीओच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले.

हिंदी

 

leave a reply