भारत व चीनचे संबंध ताणलेले आहेत

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

सँटो डॉमिंगो – अमेरिका, युरोप, रशिया आणि जपानशी भारताचे उत्तम संबंध आहेत. पण चीनबाबत मात्र तसे म्हणता येणार नाही, चीन वेगळ्या श्रेणीत मोडते. सीमावादामुळे भारताचे चीनबरोबरील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांमध्ये सीमेसंदर्भातील करारांचे उल्लंघन झाल्याने ही परिस्थिती उद्भवली, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसात भारतात एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडेल. त्याच्या आधी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनबरोबरील भारताचे संबंध सुरळीत नसल्याचे जाहीर करून चीनवरील दडपण वाढविल्याचे दिसते.

भारत व चीनचे संबंध ताणलेले आहेत - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर४ मे रोजी गोव्यामध्ये ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’च्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक सुरू होईल. चीनचे परराष्ट्रमंत्री क्विन गँग यासाठी भारतात येणार आहेत. त्याच्या आधीच भारताचे चीनबरोबरील संबंध सुरळीत नसून तणावपूर्ण बनल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. लॅटिन अमेरिकन देशांच्या दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी याआधीही भारताचे चीनबरोबरील संबंध तणावपूर्ण असल्याचे बजावले होते. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकत्याच पार पडलेल्या एससीओच्या बैठकीदरम्यान, चीनला परखड शब्दात संदेश दिला होता. सीमेवर शांतता व सौहार्द प्रस्थापित झाल्याखेरीज द्विपक्षीय संबंध सुधारणार नाहीत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनला बजावले होते.

एससीओच्या बैठकीदरम्यान भारताच्या संरक्षणमंत्र्यांची भाषा अतिशय कठोर व चिथावणीखोर असल्याची टीका चीनमधून झाली होती. याला काही दिवस उलटत नाही तोच भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तितक्याच कठोर शब्दात भारताची चीनविषयक भूमिका मांडली. अमेरिका, युरोप, रशिया व जपान या सर्वच देशांशी भारताचे उत्तम संबंध असून या देशांबरोबरील भारताचे सहकार्य वाढत चालले आहे. पण चीन वेगळ्या श्रेणीत येतो, कारण सीमावादामुळे भारताचे चीनबरोबरील संबंध ताणलेले आहेत, असा दावा जयशंकर यांनी सोमवारी केला.

लडाखच्या एलएसीवरून अजूनही चीनच्या लष्कराने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. जोवर चीन इथून लष्कर माघारी घेत नाही, तोपर्यंत भारताशी द्विपक्षीय सहकार्याची स्वप्ने चीनने पाहू नये, असा सज्जड इशारा भारताने वेळोवेळी दिला होता. पण चीन त्याकडे शक्य तितके दुर्लक्ष करीत आहे. सीमावाद कायम ठेवून द्विपक्षीय सहकार्य सुरू राहू शकते, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र भारताने सीमावादासंदर्भात कठोर भूमिका घेऊन चीनला याच्या परिणामांची जाणीव करून दिली. त्यामुळे लडाखमधील लष्करी माघार हा आता चीनच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. म्हणूनच भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या देशाबरोबरील सहकार्य पणाला लागलेले असताना, चीन लडाखच्या एलएसीवरून माघार घ्यायला तयार नाही. त्याचवेळी भारत मात्र एलएसीच्या वादात माघार घ्यायला तयार नसून चीनवरील दडपण अधिकाधिक वाढवित असल्याचे दिसते.

हिंदी

 

leave a reply