सीमेवर शांतता व सलोखा प्रस्थापित झाल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होणार नाहीत

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची चीनला समज

नवी दिल्ली – भारताबरोबर सहकार्य हवे असेल, तर चीनला सीमेवर शांतता व सलोखा कायम राखावाच लागेल. दोन्ही देशांमध्ये झालेल्या सीमाविषयक करारांचे उल्लंघन झाले तर त्यामुळे द्विपक्षीय सहकार्यासाठी केलेले सारे प्रयत्न वाया जातील, असा सज्जड इशारा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनला दिला. एससीओच्या बैठकीसाठी भारतात आलेले चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांच्याबरोबरील चर्चेत राजनाथ सिंग यांनी हे बजावल्याचे संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सीमेवर शांतता व सलोखा प्रस्थापित झाल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होणार नाहीत - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची चीनला समजशुक्रवारी नवी दिल्लीत शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक सुरू होणार आहे. त्यासाठी चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू भारतात दाखल झाले. लडाखच्या एलएसीवरील गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर, पहिल्यांदाच चीनचे संरक्षणमंत्री भारतात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे केवळ देशातीलच नाही, तर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या नजरा लागलेल्या आहेत. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची १८वी फेरी नुकतीच पार पडली होती. चर्चेद्वारे सीमावाद सोडविण्यावर एकमत झाल्याचे जाहीर करण्याखेरीज सदर चर्चेतून फारसे काहीही हाती लागलेले नाही. या पार्श्वभूमीवर, भारतात आलेल्या चीनच्या संरक्षणमंत्र्यांसमोर भारताने एलएसीसंदर्भातील आपली भूमिका परखडपणे मांडल्याचे दिसते.

द्विपक्षीय सहकार्य हवे असेल, तर एलएसीवर शांतता व सलोखा प्रस्थापित करणे गरजेचे आहे. भारताच्या मागणीनुसार चीनने एलएसीवरून आपले लष्कर मागे घेतले नाही, तर इथे शांतता व सलोखा प्रस्थापित होणे शक्य नाही. याआधी दोन्ही देशांमध्ये झालेल्या सीमा नियोजन करारानुसार इथून लष्कर माघारी घेणे आवश्यक आहे, याची जाणीव संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनला पुन्हा एकदा करून दिली. या सीमा नियोजन करारांचे उल्लंघन करून चीनने द्विपक्षीय सहकार्याच्या आधारावरच आघात केलेला आहे, ही बाब संरक्षणमंत्र्यांनी यावेळी चिनी संरक्षणमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.

संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. एससीओच्या बैठकीसाठी चीनच्या संरक्षणमंत्र्यांचे स्वागत करणे भारताला भाग पडले. पण याचा अर्थ दोन्ही देशांमधील तणाव निवळला, असा होत नसल्याची बाब भारत या निमित्ताने लक्षात आणून देत आहे. तर दुसऱ्या बाजूला चीन भारताबरोबर आपला तणाव नसून दोन्ही देशांचे संबंध सामान्य पातळीवर असल्याचा आभास निर्माण करू पाहत आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी चीनला भारताबरोबरील सहकार्याचे संबंध असल्याचे प्रदर्शित करणे भाग पडते. पण भारताचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री वेळोवेळी दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण असल्याचे सातत्याने सांगत आले आहेत.

दरम्यान, पुढच्या आठवड्यात गोव्यामध्ये एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडेल. ४ ते ५ मे दरम्यान पार पडणाऱ्या या बैठकीला चीनचे परराष्ट्रमंत्री क्विन गँग उपस्थित राहणार आहेत. यावेळीही भारताकडून एलएसीवरील तणावाचा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे संकेत मिळत आहेत. एससीओच्या बैठकीचा वापर करून भारताबरोबरील सहकार्य नव्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत आहे. पण एलएसीवरून चीनने आपले लष्कर मागे घेतल्याखेरीज द्विपक्षीय सहकार्य शक्यच नसल्याचा निर्वाळा भारताकडून देण्यात येत आहे. सीमावादाचा द्विपक्षीय सहकार्यावर परिणाम होऊ देऊ नका, हे चीनचे आवाहन भारत मान्य करण्यास तयार नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांच्याबरोबरील चर्चेत ही बाब ठामपणे मांडून भारताची भूमिका परखडपणे मांडल्याचे दिसत आहे.

leave a reply