सायबरक्षेत्रातील चीन व पाकिस्तानच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडून ‘सायबर ऑपरेशन्स विंग’ची उभारणी

- आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये निर्णय

नवी दिल्ली – सायबरक्षेत्रातील चीन व पाकिस्तानच्या वाढत्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ‘सायबर ऑपरेशन्स विंग’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स’मध्ये याला मान्यता मिळाल्याचे सांगण्यात येते. भारताची सायबरसुरक्षा क्षेत्रातील बाजू अधिक मजबूत करणे हा नव्या युनिटस्‌‍च्या स्थापनेमागील उद्देश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सायबरक्षेत्रातील चीन व पाकिस्तानच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडून ‘सायबर ऑपरेशन्स विंग’ची उभारणी - आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये निर्णयगेल्या काही वर्षात चीन व पाकिस्तानकडून भारताच्या सायबरक्षेत्रावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांची संख्या तसेच व्याप्ती वाढल्याचे समोर येत आहे. या हल्ल्यांना भारतीय लष्करासह इतर सुरक्षायंत्रणांकडून योग्य प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र सातत्याने होणारे हल्ले आणि भविष्यातील धोके तसेच आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज असल्याचे मत विविध लष्करी अधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात झालेल्या ‘आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स’मध्ये ‘कमांड सायबर ऑपरेशन्स ॲण्ड सपोर्ट विंग्ज्‌‍’ची(सीसीओएसडब्ल्यू) उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपर्कयंत्रणेची सुरक्षितता व सायबरक्षेत्रातील सज्जता वाढविण्यासाठी भारतीय लष्करात नव्या युनिटस्‌‍ची उभारणी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘पारंपारिक युद्ध व ग्रे झोन वॉरफेअर या दोन्हींचा विचार करता भारतीय लष्करासाठी सायबरक्षेत्र अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. भारताच्या प्रतिस्पर्धी देशांनी सायबरक्षेत्रातील आपल्या क्षमता पूर्वीच्या तुलनेत अधिक वाढविल्या आहेत. त्यामुळे विशेष कौशल्य असणाऱ्या पथकांची उभारणी आवश्यक आहे’, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.
गेल्या काही वर्षात भारतीय लष्करात सायबर तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून त्यात आधुनिक संपर्कयंत्रणांचाही समावेश होतो, असा दावाही यावेळी करण्यात आला. सायबरक्षेत्रातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारताने यापूर्वीच ‘डिफेन्स सायबर एजन्सी’ची स्थापना केली असून त्यावर तिन्ही संरक्षणदलांमधील सायबरक्षेत्राच्या सुरक्षेसंदर्भातील प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी आहे.

गलवानमध्ये भारत व चीनच्या लष्करामध्ये झालेल्या संघर्षानंतर, चीनमधून भारतावर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले सुरू झाले होते. पाकिस्तान देखील सातत्याने भारताच्या विरोधात सायबर हल्ले चढवित असून भारतात अशांतता व अराजक माजविण्यासाठी पाकिस्तान सायबर क्षेत्राचा वापर करीत असल्याचे समोर आले होते. भारताच्या लष्करी नेतृत्त्वाने वेळोवेळी याची दखल घेतली होती. देशाने अशा अपारंपरिक युद्धासाठीही सज्ज व्हावे, कारण अशा अपारंपरिक युद्धतंत्राचे परिणाम प्रत्यक्ष युद्धाइतकेच भयावह असू शकतात, असे भारताच्या लष्करप्रमुख, वायुसेनाप्रमुख व नौदलप्रमुखांनीही बजावले होते.

leave a reply