भारत-चीन चर्चेची ११ वी फेरी संपन्न

नवी दिल्ली – भारत आणि चीनमधील लडखच्या एलएसीवरील चर्चेची ११ वी फेरी पार पडली. इथला सीमावाद अधिक चिघळू द्यायचा नाही, यावर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांचे एकमत झाल्याचे सांगितले जाते. मात्र चीन भारत करीत असलेल्या मागणीनुसार लडाखच्या एलएसीवरून आपले जवान मागे घ्यायला तयार नसल्याचे या चर्चेनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र भारतानेही चीनने माघार?घेतल्याखेरीज या क्षेत्रातील तणाव निवळणार नाही, अशी ठाम भूमिका या चर्चेत घेतली.

लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी याआधी चर्चेच्या १० फेर्‍या पार पडल्या होत्या. शुक्रवारपासून सुरू झालेल्या ११ व्या फेरीतून फारसे काही हाती लागण्याची शक्यता नव्हती. आक्रमक डावपेच वापरून चीन कुरघोडीचे प्रयत्न करीत असताना, भारताने सदर चर्चेच्या आधी एलएसीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘१७ माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’ या पथकाला आणखी १० हजार जवानांची कुमक पुरविण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या आधी लडाखच्या एलएसीवर क्षेपणस्त्रसज्ज रफायल विमानांनी उड्डाण केले होते.

चीनचे दबावतंत्र भारताच्या विरोधात यशस्वी ठरू शकणार नाही, भारत त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देईल, हे भारताकडून वेगवेगळ्या मार्गाने चीनपर्यंत पोहोचविले जात आहे. त्यामुळे चीन अधिकच अस्वस्थ बनत चालला आहे. अशा परिस्थितीत लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रातून माघार घ्यायला चीन तयार नाही. मात्र भारताने देखील या आघाडीवर कणखर भूमिका घेतली आहे. भारताबरोबर सलोखा हवा असेल, तर चीनला इथून माघार घ्यावीच लागेल, असे भारत बजावत आहे. म्हणूनच लडाखच्या एलएसीवरील ही समस्या नजिकच्या काळात सुटण्याची शक्यता नाही, असा निर्वाळा भारताच्या लष्करी अधिकार्‍यांनी दिला होता.

तसेच चीनबरोबर चर्चा सुरू असली तरी भारतीय लष्कर या क्षेत्रात अतिशय सावध असल्याचे स्पष्ट होत आहे. चीनचे लष्कर इतक्या इथून माघार घेणार नाही, याची कल्पना भारतीय लष्कराला आहे. त्यामुळे कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची तयारी भारतीय लष्कराने ठेवलेली असल्याची माहिती, वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी दिली आहे. पुढच्या काळात चीनने घुसखोरीचे नवे प्रयत्न करून पाहिले, तर त्याला आधीपेक्षाही कठोर उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट संकेत भारताकडून दिले जात आहेत. त्याचवेळी राजकीय आघाडीवर चीनला प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी भारताने केल्याचे दिसू लागले आहे.

या महिन्याच्या अखेरीस जपानचे पंतप्रधान सुगा भारताच्या भेटीवर येणार आहेत. तसेच भारत व जपानमध्ये टू प्लस टू अर्थात परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्र्यांच्या पातळीवरील चर्चा संपन्न होईल. भारत व जपानच्या सहकार्याकडे चीन नेहमीच संशयाने पाहत आला आहे. म्हणूनच जपानच्या पंतप्रधानांची ही भारतभेट चीनवर अपेक्षित परिणाम साधणारी ठरू शकते.

leave a reply