भारत व पाकिस्तानमध्ये दिर्घकाळ चालणारे युद्ध पेटेल

- अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल’चा दावा

वॉशिंग्टन – काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराने संघर्षबंदी लागू केली आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल, अशी दाट शक्यता काहीजणांकडून वर्तविली जात आहे. याच्याही पुढे जाऊन पाकिस्तानी पत्रकारांनी ऑक्टोबर महिन्यात भारताचे पंतप्रधान पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचे दावे केले आहेत. असे असताना, अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल’ने मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये दिर्घकाळ चालणारे युद्ध भडकेल, असा निष्कर्ष नोंदविणारा अहवाल दिला आहे. तसेच भारताचा चीनशीही संघर्ष उद्भवू शकतो, असा दावा या अहवालात करण्यात आलेला आहे.

तालिबानने दिलेल्या मुदतीत अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेणार नाही, त्यासाठी आणखी सहा महिने लागतील, असे बायडेन प्रशासनाने तालिबानला बजावले आहे. या दरम्यान नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलचा अहवाल समोर आला आहे. अमेरिकेच्या अफगाणिस्तानविषयक धोरणांचे परिणाम दक्षिण आशियाई क्षेत्रावर होतील, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तनातून सैन्य माघारी घेतले तर अफगाणी लष्कर आणि तालिबानमध्ये घनघोर संघर्ष पेट घेईल. या संघर्षाचा लाभ या क्षेत्रातील दहशतवादी संघटनांना मिळेल व या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात मुक्तपणे संचार करू शकतील. याचा पाकिस्तानच्या अंतर्गत स्थितीवर परिणाम होईल. काही प्रबळ दहशतवादी संघटना भारतात मोठा घातपात घडवून आणू शकतात, याकडे सदर अहवालात लक्ष वेधण्या आले आहे.

आपल्यावर झालेला हा दहशतवादी हल्ला अत्यंत गंभीर आहे व त्याला उत्तर देणे भागच आहे, हे एकदा का भारत सरकारने ठरविले तर मग भारताचे पाकिस्तानशी युद्ध सुरू होईल. पाकिस्तानला आपला बचाव करणे भाग पडेल. या युद्धात परस्परांच्या क्षमतेबाबतचे गैरसमज निर्णायक ठरतील. हे युद्ध दिर्घकाळ चालणारे असेल, अशी नोंद सदर अहवालात करण्यात आली आहे. याबरोबरच एखाद्या गैरसमजातून देखील भारत व पाकिस्तानात युद्धाचा भडका उडेल, असा दावा अमेरिकेच्या नॅशनल इंटेजिलन्स कौन्सिलने केला आहे. भारत व पाकिस्तानच्या युद्धाची शक्यता वर्तवित असताना, भारताचा चीनबरोबर संघर्ष होऊ शकतो, असा दावा कौन्सिलच्या या अहवालात करण्यात आला आहे. यासाठी गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर झालेल्या भारत-चीन संघर्षाचा दाखला देण्यात आला आहे.

दरम्यान, नैसर्गिक आपत्ती देखील देशांच्या भवितव्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात, याची लक्षवेधी नोंद सदर अहवालाने केली आहे. १९७० साली त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमध्ये जबरदस्त चक्रीवादळ आले होते. याचा सामना करताना पाकिस्तानचे प्रशासन अपयशी ठरले. यामुळे १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली होती, याकडे सदर अहवालाने लक्ष वेधले. आत्ताच्या काळातही अशा घटना घडू शकतात, असे दावे करून कोरोनाच्या साथीमुळे भारतासह दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांवर आलेल्या ताणाचा दाखला नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलने दिला आहे.

भारत व चीनमध्ये दक्षिण आशियात वर्चस्वाचे युद्ध सुरू आहे. या युद्धात काही देश भारताची बाजू सोडून चीनकडे झुकू शकतात. त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी भारत जपानचे सहाय्य घेऊ शकतो, असा दावा सदर अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही अमेरिकेत भारत व पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तविणारे अहवाल प्रसिद्ध झाले होते. त्याचवेळी भारत व चीन यांच्यात युद्ध पेट घेईल, असे दावे अमेरिकन विश्‍लेषक करीत होते. नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलचा अहवाल देखील अशीच भीतीदायक शक्यता वर्तवित आहे. मात्र अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघार टाळण्यासाठी सदर अहवालाचा वापर केला जाण्याची अधिक शक्यता आहे. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात तैनात ठेवणे हे दक्षिण आशियाई क्षेत्राच्या स्थैर्य व सुरक्षेसाठी आवश्यक आहे, हे पटवून देण्यासाठी बायडेन यांचे प्रशासन या अहवालाचा वापर करू शकेल. त्या दिशेने बायडेन प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या असून हा अहवाल त्यासाठी सादर केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

leave a reply