भारतात आठवड्याभरात कोरोनाचे रुग्ण ६७ टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली/मुंबई – देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू?झाल्यानंतर आठवड्याभरात कोरोनाचे रुग्ण ६७ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका आठवड्यात देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या तब्बल १ लाखांनी वाढली आहे. तसेच आठवड्याभरात १२३९ जणांचा बळी गेला आहे. यातील ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. सोमवारी महाराष्ट्रात रविवारच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या कमी नोंदविण्यात आली आहे. सोमवारी २४ हजार ६४५ नवे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत व ५८ रुग्ण दगावाले. महाराष्ट्रात काही भागांमध्ये परिस्थिती बिकट असून कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत पुन्हा एकदा राज्य सरकारने दिले आहेत.

रविवारपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात देशभरात ४७ हजार नवे रुग्ण आढळले होते, तर २१२ जणांचा बळी गेला होता. यातील ३० हजाराहून अधिक रुग्ण महाराष्ट्रातच आढळले होते. त्यानंतर पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. तर सोमवारी महाराष्ट्रात २४ हजार ६४५ नवे रुग्ण आढळले. मुंबईत ३२६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि १० जणांचा मृत्यु झाला. पुणे मंडळात ४ हजार ७३७ नवे रुग्ण सापडले. यातील पुणे पालिका क्षेत्रात २३६५ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे मंडळात ६२१२ नवे रुग्ण आढळले.

नागपूर मंडळात ४२३१ नव्या रुग्णांची नांेंद झाली असून नागपूर पालिका क्षेत्रात २७४१ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच नाशिक मंडळात ३७२१ नवे रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान, राज्यातील रुग्ण संख्येत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाली असली संख्या चिंताजनक आहे. राज्यातील काही भागात परिस्थिती बिकट असून शिस्त पाळली गेली नाही, तर पुढील कठोर निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

leave a reply