भारताने कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत लसींचे ७५ कोटी डोस देण्याचा विक्रमी टप्पा ओलांडला

- भारताच्या वेगवान लसीकरण मोहिमेची ‘डब्ल्यूएचओ’कडून प्रशंसा

७५ कोटीनवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होऊन २४१ दिवस झाले असून आतापर्यंत ७५ कोटींहून अधिक लसीचे डोस या लसीकरण मोहिमेअंतर्गत देण्यात आले. जगात सर्वाधिक वेगाने भारतात लसीकरण होत आहे. सध्याच्या घडीला देशभरात दिवसाला सरासरी ६८ लाखांहून अधिक जणांना लस दिली जात आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत एका दिवसात ६७ लाख ४ हजार जणांना लसीची मात्रा देण्यात आली. ७५ कोटी लसीचे डोस देण्याचा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर सर्वबाजूने भारताच्या लसीकरणाचे कौतूक होत असून जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताच्या या वेगवान लसीकरण कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे.

सोमवारी सायंकाळी देशातील लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ७५ कोटी डोस देण्याचा टप्पा ओलांडला गेला. अवघ्या १३ दिवसात देशभरात १० कोटी लसींचे डोस देण्यात आले. तर गेल्या २६ दिवसात २० कोटी जणांचे लसीकरण झाले आहे. ऑगस्ट महिन्यात १८ कोटीहून अधिक जणांना लसीचे डोस देण्यात आले होते. १६ जानेवारीला देशात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली होती. सुरुवातीला केवळ डॉक्टर, आरोग्य कर्मचार्‍यांसाठी व त्यानंतरच्या टप्प्यात फ्रन्ट लाईन वर्कर्ससाठी लसीकरण सुरू करण्यात आले. पहिले १० कोटी लस देण्यासाठी ८५ दिवसांचा कालावधी लागला होता.

२१ जून पासून नव्या लसीकरण धोरणाअंतर्गत केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणही आपल्या हातात घेतले होते. यानुसार राज्यांना लस पुरविठा सुरू झाला. त्यानंतर लसीकरण कार्यक्रमाने वेग पकडल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सरासरी ६८ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण होत आहे. तसेच आतापर्यंत दोन वेळा दिवसाला एक कोटीहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. ५६ कोटी ९५ लाख ७७ हजाराहून अधिक जणांना लसीचा पहिला डोस, तर १८ कोटी १४ लाख ६३ हजाराहून अधिक जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. ९९ टक्के आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्ट लाईन वर्कर्सला आतापर्यंत एकतरी डोस मिळालेला आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १ कोटी ३ लाख ६४ हजाराहून अधिक आरोग्य कर्मचार्‍यांना एक डोस मिळाला आहे, तर ८६ लाख ११ हजार कर्मचार्‍यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तसेच १ कोटी ८३ लाखाहून अधिक फ्रन्ट लाईन वर्कर्सना लसीचा पहिला डोस मिळाला असून १ कोटी ४१ लाख जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तेच १८ ते ४४ वयोगटात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. या वयोगटातील ३० कोटी २६ लाख जणांना लसीचा पहिला डोस, तर ४ कोटी ५२ लाख ८७ हजार जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. याशिवाय ४५ ते ५९ वयोगटातील सुमारे १४ कोटी ४६ लाख जणांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे. तर ६ कोटी ३७ लाख जणांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. ६० वर्षांवरील ९ कोटी ३६ लाख ६८ जणांना पहिला डोस आणि ४ कोटी ९७ लाख जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक वेगाने लसीकरण होत आहे. उत्तर प्रदेशातील लसीकरणाचा वेग हा अमेरिका, मेक्सिको, कॅनडा, रशियापेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशात दिवसाला सरासरी ११.७३ लाख डोस दिले जात आहेत. तेच अमेरिकेत दिवसला सरासरी ८ लाख डोस दिले जात आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेशात आठ कोटीहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. यानंतर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये अनुक्रमे दिवसाला सरासरी ७.६ लाख, ४.८० लाख, ३.७१ लाख आणि ४.५ लाख जणांना लस देण्यात येत आहे. महाराष्ट्रात सुमारे ७ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, दादरा-नगर हवेली दिव दमण, गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, लक्षद्विप, सिक्कीम ही छोटी राज्य व केंद्र शासीत प्रदेशात १०० टक्के नागरिकांना लसीचा किमान एकतरी डोस मिळालेला आहे. या राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर घटला आहे. नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. याचे प्रमुख कारण या राज्य व केंद्र शासित प्रदेशांमध्ये तेथील लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाचा स्तर चांगला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लसीकरण याच वेगाने सुरू राहिले तर डिसेंबर अखेरीसपर्यंत आणखी ९० लाख डोस दिले जातील. तसेच किमान ४५ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील, असा अंदाज वक्त केला जात आहे. लवकरच भारत १०० कोटी लसीचे डोस देण्याचा टप्पा ओलांडेल याकडेही तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.

leave a reply