भारताने कोरोना लसीकरणाचा 25 कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – भारतात आतापर्यंत लसींचे 25 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वयोगटातीलही चार कोटीहून अधिक जणांनी पहिली लस घेतली असून याबाबतीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. 21 जूनपासून केंद्र सरकार 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसी राज्यांना पुरविणार असून राज्यांच्या सहाय्याने या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबविणार आहे. यानंतर लसीकरण मोहिमेला अधिक वेग येईल, असे दावे केले जात आहे.

लसीकरणाचा

यावर्षीच्या 16 जानेवारीपासून भारतात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या सहाय्याने लसीकरण सुरू झाले होते. हा लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यापासून आता 148 दिवस लोटले असून 25 कोटी नागरिकांना लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत 25 कोटी 28 लाख 78 हजार डोस देण्यात आले आहेत. यामध्ये एक लसीची पहिली मात्रा घेतलेले 20 कोटी 46 लाख जण आहेत. विशेष म्हणजे 18 ते 44 वर्ष वयोगटातील लसीकरणासाठी सध्या कमी लसी उपलब्ध होत असल्या व हे लसीकरण 1 मे पासून सुरू झाले असले, तरी आतापर्यंत चार कोटीहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे.

18 ते 44 वयोगटातील लसीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश सर्वात आघाडीवर असून या राज्यात 45 वर्षांखालील 43 लाखाहून अधिक जणांना लसीचा एकतरी डोस मिळालेला आहे. तसेच मध्य प्रदेशात साडे चाळीस लाखांहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. याच वयोगटातील महाराष्ट्रात 23 लाख 24 हजार जणांना लस मिळाली आहे. राजस्थानात 33 लाखांहून अधिक जणांना लस मिळाली आहे. देशातील 37 राज्ये व केंद्रशासीत प्रदेश मिळून 18 ते 44 वर्ष वयोगटातील 4 कोटी 31 लाख जणांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर 6 लाख 74 हजार जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

leave a reply