भारताचा विकास चीनच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहू शकत नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘उत्पादनाशी निगडीत पुरवठा साखळी देशातच विकसित करता आली नाही, तर भारत महान राष्ट्र बनू शकणार नाही. भारताचा विकास चीनच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहू शकत नाही’, असे परखड उद्गार परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काढले आहेत. ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना केवळ आर्थिक किंवा देशांतर्गत उत्पादनाशी निगडीत नाही. तर त्याला फार मोठे धोरणात्मक महत्त्व आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उद्योगक्षेत्राला करून दिली. ‘मेक इन इंडिया: 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राईज’च्या कार्यक्रमाला संबोधित करताना जयशंकर यांनी हा संदेश दिला.

भारताचा विकास चीनच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहू शकत नाही - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरलडाखच्या एलएसीवर गेल्या तीन वर्षांपासून तणाव निर्माण झालेला असताना देखील चीनची भारतातील निर्यात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. 2021-22 या वित्तीय वर्षात भारताचा चीनबरोबरील व्यापार जवळपास 136 अब्ज डॉलर्सवर गेला. यात चीन भारताला करीत असलेल्या निर्यातीचे प्रमाण 118.5 अब्ज डॉलर्स इतके आहे. भारतीय उद्योगक्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल बऱ्याच प्रमाणात चीनमधून आयात केला जातो. यामुळे प्रयत्न करूनही भारताला चीनची निर्यात रोखता आलेली नाही. थेट उल्लेख केलेला नसला तरी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उद्योगक्षेत्राला यावरून खडे बोल सुनावल्याचे दिसत आहे.

अर्थव्यवस्था खुली करण्याच्या व जागतिकीकरणाच्या नावाखाली आपल्याला देशाच्या औद्योगिकीकरणाची चाके उलटी फिरविता येणार नाही. जे देश आपल्या उत्पादनांसाठी सबसिडी देतात, त्यांना भारतात सवलती देऊन आपली बाजारपेठ काबीज करण्याची संधी देणे म्हणजे आर्थिक आघाडीवर आत्महत्याच ठरते, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बजावले. भारतीय उद्योगक्षेत्राने उत्पादनाशी निगडीत पुरवठा साखळी देशातच विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करायला हवे. ही बाब एकाएकी घडणार नाही, मात्र त्याला सर्वोच्च प्राधान्य देणे भाग आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

भारताचा विकास चीनच्या कार्यक्षमतेवर विसंबून राहू शकत नाही, असे अत्यंत मार्मिक विधान यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केले. उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी भारताचे चीनवरील अवलंबित्त्व पुढच्या काळात घातक ठरू शकते. त्यामुळे मेक इन इंडियाला सर्वोच्च प्राधान्य द्यायलाच हवे. देशांतर्गत उत्पादन ही केवळ आर्थिक किंवा औद्योगिक उत्पादनापुरती मर्यादित बाब नाही. तर त्याला फार मोठे धोरणात्मक महत्त्व आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. वेळ आल्यास चीनसारखा मतलबी देश कच्च्या मालाचा पुरवठा रोखून भारताची कोंडी करू शकतो, ही बाब परराष्ट्रमंत्री जयशंकर वेगळ्या शब्दात उद्योगक्षेत्राच्या लक्षात आणून देत असल्याचे दिसत आहे.

कोरोनाची साथ आलेली असताना, याचा सामना कसा करायचा यावर बाहरेच्या देशातून बरेच सल्ले मिळत होते. सुदैवाने आपल्याकडच्या कुणीही हे सल्ले मनावर घेतले नाहीत आणि ही समस्या सोडविण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने पुढाकार घेतला, असा टोला देखील जयशंकर यांनी यावेळी लगावला.

हिंदी

 

leave a reply