भारत जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा देश बनेल

- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास

नवी दिल्ली – देशाच्या बँकिंग क्षेत्राकडे फार मोठी क्षमता आहे. या बँकिंग क्षेत्राशी निगडीत सर्व घटक एकत्र आले, तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे घेेऊन जातील. इतकेच नाही तर यामुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा देश बनेल, असा विश्‍वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

ठेवींवर पाच लाखाच्या विमा योजनेअंतर्गत बुडीत गेलेल्या बँकांमधील ठेवीदारांना विमा परतावा देण्यासंदर्भातील कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. १९९३ सालानंतर प्रथमच ठेवीवरील विमा संरक्षणाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. ही मर्यादा एका लाखाहून पाच लाख करण्यात आली. गेल्या वर्षात बुडीत गेलेल्या बँकांमधील खातेदारांना या योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशाच्या बँकिंग क्षेत्राचे अर्थव्यवस्थतेतील महत्व अधोरेखित केले. आपली बँकिंग व्यवस्था लवचिक असावी, याकडे रिझर्व्ह बँक अधिक लक्ष पुरवित आहे. यादृष्टीने पतधोरणही आखले जात आहे. विविध क्षेत्रांच्या विकासात बँकिंग क्षेत्राचे योगदान मोठे असते. त्यामुळे बँकिंग क्षेत्राची कामगिरी अर्थव्यवस्थेसाठी अतिशय मोलाची असते, ही बाब आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी लक्षात आणून दिली.

त्यामुळे बँकिंग क्षेत्राशी निगडीत सर्व घटक एकत्र आले, त्यांनी संघटीतरित्या काम केले, तर देशाच्या बँकिंग क्षेत्राची भरभराट होईल. पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. देशाच्या बँकिंग क्षेत्राने संघटीतरित्या काम केल्यास भारत जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा देश बनू शकतो, असा विश्‍वास शक्तीकांत दास यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असताना सर्व जग भारताकडे आशेने पाहत असल्याचे तज्ज्ञांचे दावे आहेत. या पार्श्‍वभूमीवर शक्तीकांत दास यांच्या या विधानाचे महत्त्व वाढले आहे. दरम्यान, अधिक व्याजाच्या आशेने ठेवी ठेवणार्‍यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी सावधानतेचा इशारा दिला. अधिक व्याजदराच्या ठेवीमागे जोखीम दडलेली असते, हे ग्राहकांनी ध्यानात घेतलेले बरे, असे शक्तीकांत दास यांनी बजावले आहे. जास्त व्याजदराचे प्रलोभन दाखवून आपली फसवणूक केली जात नाही ना, याकडे ठेवीदार व खातेदारांनी लक्ष द्यायला हवे, असा सल्ला दास यांनी दिला आहे.

leave a reply