‘डीआरडीओ’कडून रणगाडाभेदी ‘सॅन्ट’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली – हेलिकॉप्टरमधून मारा करता येणार्‍या ‘स्टँड ऑफ अँटी टँक’ (सॅन्ट) या स्वदेशी बनावटीच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी ‘डीआरडीओ’ आणि भारतीय वायुसेनेने घेतली. पोखरण येथे ही चाचणी पार पडली. या यशस्वी चाचणीमुळे स्वदेशी संरक्षणक्षमता वाढण्यास अधिक बळ मिळेल असे डीआरडीओ अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी म्हटले आहे.

‘सॅन्ट’ क्षेपणास्त्र चाचणीत सर्व पातळ्यांवर खरे उतरले आहे. क्षेपणास्त्राची रिलीज यंत्रणा, प्रगत मार्गदर्शन आणि ट्रॅकिंग अल्गोरिदम, एकात्मिक सॉफ्टवेअरसह सर्व यंत्रणांची चांगली कामगिरी दिसून आली. हे क्षेपणास्त्र अचूकता वाढविणार्‍या अत्याधुनिक ‘एमएमडब्ल्यू’ (मिलिमीटर वेव्ह) सीकरने सुसज्ज आहे. या क्षेपणास्त्राद्वारे १० किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेता येऊ शकतो. स्टॅन्ड ऑफ अँटी टँक (सॅन्ट) हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र डीआरडीओचा भाग असलेल्या ‘रिसर्च सेंटर इमारत’ने (आरसीआय) सहाय्याने विकसित केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय वायुसेनेच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देणार्‍या लांब पल्ल्याच्या बॉम्ब आणि स्मार्ट अँटी एअरफील्ड क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू आहेत. स्वदेशी स्टँड-ऑफ शस्त्रास्त्रांच्या मालिकेतील ‘सॅन्ट’ हे तिसरे क्षेपणास्त्र आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र खुपच महत्त्वाचे ठरते. संरक्षणदलाच्या आत्मनिर्भरतेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचा दावा केला जातो.

हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र हेलिना क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे. हेलिना क्षेपणास्त्राची मारकक्षमता ७ ते ८ किलोमीटर होती. तर ‘सॅन्ट’ क्षेपणास्त्राची मारकक्षमता त्यापेक्षा अधिक आहे.

‘एएलएच रुद्र एमके ४’ आणि हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर्ससाठी ‘सॅन्ट’ या हवेतून मारा करणार्‍या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कोअरने (एएसी) एकत्रितरित्या चार हजार ‘सॅन्ट’ क्षेपणास्त्राची मागणी नोंदविली आहे.

बुधवारी ‘डीआरडीओ’ने वायुसेनेची आवृत्ती असणार्‍या ‘ब्रह्मोस’ सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. ओडिशाच्या चांदीपूर तळावरुन घेतलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य अचूक भेदले. तसेच मंगळवारी डीआरडीओने नौदलासाठी विकसित केलेल्या ‘व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल’ची चाचणी घेतली होती. तर शनिवारी लष्करासाठी विकसित करण्यात आलेल्या पिनाका या रॉकेट यंत्रणेच्या चाचण्या पार पडल्या होत्या. एकूण २४ रॉकेट यावेळी डागण्यात आली होती.

leave a reply