भारताचे आर्थिक पातळीवरील प्रत्युत्तर चीनला महागात पडेल

- अमेरिकन लेखक गॉर्डन चँग

वॉशिंग्टन – ‘कोरोनाव्हायरसमुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना जगभरातून जबरदस्त हादरे बसत आहेत. यामुळे चीनची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना सत्ता गमावण्याचे भय वाटू लागले आहे व या भयापोटीच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी भारत, अमेरिका, साऊथ चायना सी, कजाकिस्तान, पूर्व युरोप अशा अनेक आघाड्यांवर एकाचवेळी संघर्ष छेडला आहे. लडाखमधील हल्ल्यानंतर भारताने चीनला दिलेले लष्करी प्रत्युत्तर योग्यच ठरते. पण याबरोबर भारताने चीनला आर्थिक पातळीवरही दणका द्यावा. कारण भारताचे हे आर्थिक प्रत्युत्तर चीनवर मोठा आघात करील. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा लष्करी आणि आर्थिक आघाड्यांवरील पराभव साऱ्या जगाच्या भल्याचा ठरेल’, असा दावा अमेरिकन लेखक गॉर्डन चँग यांनी केला आहे.

India-China‘जिनपिंग यांच्याकडे चीनची संपूर्ण सत्ता आहे. त्यामुळे ते चीनच्या अपयशासाठी इतर कोणालाही दोष देऊ शकत नाहीत. म्हणूनच जगभरात उघडलेल्या वेगवेगळ्या आघाड्यांपैकी कुठल्यातरी एका आघाडीवर विजय मिळवणे त्यांच्यासाठी अनिवार्य बनले आहे. लडाखचा ताबा घेऊन हा आपला भारतावरील विजय असल्याची घोषणा करण्याची जिनपिंग यांची योजना होती. भारताने बळकावलेला आपला भूभाग चीनने परत मिळवला, असे चित्र चिनी जनतेसमोर उभारण्याची पूर्ण तयारी सरकारी मुखपत्रांनी केली होती. पण भारतीय लष्कराच्या प्रतिहल्ल्याने जिनपिंग यांच्या योजना उधळून गेल्या आहेत’, असे चँग यांनी सांगितले. भारत आणि चीन यांच्यामधील संघर्षाबाबत अशी वेगळी मांडणी करुन गॉर्डन चँग यांनी खळबळ माजविल्याचे दिसत आहे.

‘यापुढे भारताने चीनच्या सीमेवरील आपली तैनाती वाढवावी व त्याचबरोबर चीनच्या अर्थव्यवस्थेला हादरे देणारे निर्णय घ्यावे. कारण अर्थव्यवस्थेवरील हल्ले चीनला जबर धक्के देणारे ठरतील. यासाठी भारताने चिनी कंपन्यांबरोबरचे सारे करार रद्द करावेत, हुवैई कंपनीला भारतात प्रवेश देऊ नये, चिनी मालावर बहिष्कार टाकावा. भारताच्या भूमिकेत हा आक्रमक बदल दिसेल तेव्हाच चीन भारताचा आदर करायला सुरुवात करील. अन्यथा चीन भारताचे लचके तोडण्याचे काम करीतच राहील’, असा परखड सल्ला गॉर्डन चँग यांनी दिला आहे. चीनबरोबर सीमावाद सुरू झाल्यानंतर काही भारतीयांनी पुढाकार घेऊन चिनी उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम छेडली होती. चँग यांनी दिलेला सल्ला भारतीयांची ही चीनविरोधी मोहीम सर्वथा योग्य असल्याचे दाखवून देत आहे.

लडाखच्या गलवान व्हॅलीत चिनी जवानांनी भारतीय सैनिकांवर चढविलेला भ्याड हल्ला म्हणजे पूर्वनियोजित कट होता आणि चीनच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने या हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला होता, अशी माहिती माध्यमांमध्ये आली होती. पण गॉर्डन चँग यांनी चीनच्या या हल्ल्यामागे चीनमधील अंतर्गत राजकारणाचा संदर्भ असल्याचा दाखला दिला आहे. भारताच्या प्रत्युत्तराबाबत चुकीचे आडाखे बांधणाऱ्या चीनच्या लष्करी व राजकीय नेतृत्त्वाला याचे अधिक गंभीर परिणाम सहन करावे लागतील, असे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply