ड्रोनच्या सहाय्याने टोळधाड थोपविणारा भारत जगातील पहिला देश

नवी दिल्ली- टोळधाडींवर ड्रोनच्या सहाय्याने नियंत्रण मिळविणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे, असे केंद्रीय कृषीमंत्रालयाकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या खाद्य आणि कृषी संघटनेने देखील(एफएओ) भारताने टोळधाड नियंत्रणात ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचे कौतुक केले होते. एप्रिल महिन्यात पाकिस्तानातून राजस्थानमध्ये आलेल्या टोळधाडींनी लाखो हेक्टर शेतीचे नुकसान केले आहे. त्यामुळे या टोळधाडींना संपवण्यासाठी राजस्थानच्या बिकानेर आणि अजमेरमध्ये ड्रोनचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता.

Drone-LocustAttackटोळधाडीविरोधात ड्रोनवापराचे प्रोटोकॉल निश्चित केल्यावर आणि यासंदर्भांत मान्यता मिळाल्यानंतर, टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू केला. असे करणारा भारत पहिला देश आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्रालयाने दिली. सध्या राजस्थानमध्ये विविध भागात १२ ड्रोनद्वारे बाडमेर, जेसलमेर, बिकानेर, नागोर आणि जोधपुरमध्ये टोळधाडींना ड्रोनच्या सहाय्याने थोपविले जात असून हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

२१ जूनपर्यंत राजस्थान, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश,महाराष्ट्र, छत्त्तीसगड आणि मध्य प्रदेशमधल्या ११४,०२६ हेक्टर जमीनीवर टोळधाडीवर नियंत्रण मिळवले आहे. यात गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये अजूनही टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसात या टोळधाडी नव्याने पीकांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या टोळधाडींना संपवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्रालय काम करीत आहे. त्यामुळे राजस्थानमधील प्रयोग यशस्वी ठरल्यावर इतर सहा राज्यांमध्ये ड्रोनचा प्रयोग केला जाईल, असे संकेत कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले.

टोळधाडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयोगाचे संयुक्त राष्ट्र संघाच्या खाद्य आणि कृषी संघटनेने कौतुक केले आहे. ह्या तंत्रज्ञानाचा वापर इतर देशांमध्ये केला जावा असे आवाहन एफएओने दिले आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत विकसित केलेले ड्रोन भविष्यात कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देईल असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

leave a reply