भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आहे

- ‘एस-४००’वरून इशारे देणार्‍या अमेरिकेला भारताची समज

नवी दिल्ली – रशियाकडून भारत खरेदी करीत असलेल्या ‘एस-४००’ या हवाई सुरक्षा यंत्रणेवरून अमेरिकेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जेस्टर यांनी भारताला कठोर निर्णय?घ्यावे लागतील, असे म्हटले आहे. रशियाबरोबरील हा संरक्षण व्यवहार पूर्ण केल्यास, भारताला अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो, याची जाणीव जेस्टर यांनी करून दिली. मात्र भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आहे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला बजावले आहे. कुणाकडून कुठली शस्त्रास्त्रे खरेदी करायची, याचा निर्णय आपल्या सुरक्षाविषयक गरजा ध्यानात घेऊन भारताकडून घेतला जातो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत सत्ताबदल होत असून भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन लवकरच सत्ता हाती घेतील. बायडेन यांचे भारताबाबतचे धोरण ट्रम्प यांच्यासारखे असू शकणार नाही. बायडेन अनेक मुद्यांवर भारताच्या विरोधात भूमिका स्वीकारतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांच्या काळात भारताला अमेरिकेकडून मिळालेल्या सवलती बायडेन यांच्याकडून दिल्या जाणार नाहीत, असेही काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जेस्टर यांनी यासंदर्भात केलेली विधान विश्‍लेषकांच्या या दाव्याला दुजोरा देणारी आहेत. भारताने रशियाकडून एस-४००ची खरेदी करताना काही कठोर निर्णय घ्यावे, असे सांगून हा व्यवहार पूर्ण झाल्यास भारताला अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करावा लागेल, असे संकेत दिले.

रशियाकडून ही यंत्रणा खरेदी करण्यापेक्षा भारत अमेरिकेकडून याहून अधिक प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करू शकेल, असा प्रस्तावही राजदूत जेस्टर यांच्याकडून देण्यात आला. अमेरिकेच्या निर्बंधांची पर्वा न करता भारताने रशियाबरोबर ५.४३ अब्ज डॉलर्सचा हा संरक्षण व्यवहार पूर्ण केला होता. यानुसार भारताला पाच ‘एस-४००’ यंत्रणा रशियाकडून पुरविल्या जाणार आहेत. यामुळे भारताची हवाई सुरक्षा अधिकच भक्कम होईल, असे मानले जाते. अमेरिकेने यावर आक्षेप घेतला होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर निर्बंध लादण्याची धमकीही दिली होती. मात्र अमेरिकन कायद्यानुसार यावर कारवाई करण्याचे टाळले होते.

राजदूत केनेथ जेस्टर यांनी यासंदर्भात केलेली विधाने भारतावर दडपण वाढविण्याच्या अमेरिकेच्या नव्या प्रशासनाच्या डावपेचाचा भाग असू शकतो. याचा वापर दोन्ही देशांमधील वाटाघाटीसाठी केला जाण्याची अधिक शक्यता आहे. याच्या पलिकडे जाऊन बायडेन यांच्या प्रशासनाने भारतावर निर्बंध लादले, तर त्याचा फटका अमेरिकेला बसण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारत एकाच वेळी अमेरिकेचा विश्‍वासू मित्रदेश आहे आणि रशियाबरोबरही भारताचे पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध आहेत, याची जाणीव करून दिली. भारत आपल्या गरजा लक्षात घेऊनच संरक्षणविषयक खरेदी करतो व भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आहे, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. याद्वारे भारताने पुन्हा एकदा अमेरिकेला संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply