लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करणार्‍या चीनच्या जवानाला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले

- सुटकेसाठी चीनचे आवाहन

नवी दिल्ली –  लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करणार्‍या चीनच्या जवानाला भारतीय लष्कराने ताब्यात?घेतले आहे. लडाखच्या पँगाँग सरोवर क्षेत्राच्या दक्षिणेकडील एलएसीवरून या चिनी जवानाने घुसखोरी केली होती. चीनने आपला जवान भारताच्या ताब्यात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. भारताने लवकरात लवकर या जवानाची सुटका करावी, अशी मागणी चीनच्या लष्कराने केली आहे. तसेच या घटनेमुळे सीमावाद अधिकच चिघळणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही चीनच्या लष्कराकडून केले जात आहे.  तर भारतीय लष्कराने ज्या परिस्थितीत या जवानाने हद्द ओलांडली, त्याची माहिती घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  या जवानाला चीनकडे सोपविले जाईल, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

काळोख आणि प्रतिकूल हवामान यामुळे आपला जवान वाट चुकला आणि बेपत्ता झाला होता. भारतीय यंत्रणांना याची माहिती देण्यात आली व सध्या तो भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे, असे चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) निवेदनात स्पष्ट करण्यात आले. भारताने आपल्या जवानाची त्वरित सुटका करावी व लडाखच्या एलएसीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असेही ‘पीएलए’च्या या निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी या घटनेला भारतीय माध्यमे अवास्तव महत्त्व देत असल्याची टीका चीनकडून केली जात आहे. एलएसीवर दोन्ही देशांचे जवान एकमेकांच्या हद्दीत प्रवेश करतात, त्यामुळे ही काही विशेष बाब ठरत नसल्याचे चीनच्या विश्‍लेषकाने म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराने आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चीनच्या या जवानाची सुटका केली जाईल, असे स्पष्ट केले. ज्या परिस्थितीत या जवानाने एलएसी पार केली, त्याची माहिती घेतली जाईल व त्यानंतरच या जवानाची सुटका होईल, असे भारतीय लष्कराकडून सांगितले जाते. याआधी ऑक्टोबर महिन्यात एलएसीवरील डेमचोक सेक्टरमधून चीनच्या जवानाला  भारतीय लष्कराने ताब्यात घेतले होते. दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर या जवानाला चीनच्या हवाली करण्यात आले होते.

सध्या एलएसीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या जवानांची घुसखोरी ही सर्वसामान्य बाब ठरत नाही. भारतीय लष्कर याबाबत अतिशय सावध असल्याचे दिसते. दरम्यान, लडाखमधील सीमावाद सोडविण्यासाठी भारत आणि चीनचे वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेची ९वी फेरी लवकरच पार पडेल. एलएसीवर गैरसमजुतीतून संघर्ष पेट घेऊ नये, यासाठी उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांनी संपर्क ठेवलला आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, चिनी जवानाच्या या बातमीला भारतीय माध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीवर पीएलएने केलेली टीका लक्ष वेधून घेत आहे. एलएसीवरील वाद भारतीय माध्यमे अधिकच पेटवित असल्याचा आरोप चीनने याआधीही केला होता. लडाखच्या एलएसीवर चीनच्या लष्कराची अवस्था इथल्या खडतर हवामानामुळे बिकट बनलेली आहे. याचे अहवाल भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर चीनच्या अवस्थतेत अधिकाधिक भर पडत चालली आहे. भारतीय माध्यमांवर खोटेपणाचे आरोप करून चीन या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे दावे करीत आहे खरा. पण आपले जवान लडाखच्या हवामानात उत्तम स्थितीत असल्याचा चीनचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी स्वीकारलेला नाही. उलट लडाखच्या एलएसीवर भारतीय लष्कर वर्चस्व गाजवित असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचेही म्हणणे आहे. यामुळे चीन सातत्याने भारतीय माध्यमांना लक्ष्य करीत आहे.

leave a reply