भारत व फ्रान्स कोरोनाविरोधी लढाई एकजुटीने जिंकतील

- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन

पॅरिस – कोरोनाच्या विरोधातील या लढ्यात भारत आणि फ्रान्स एकजुटीने जिंकतील, असा विश्‍वास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी व्यक्त केला. भारतातील कोरोनाची साथ चिंताजनकरित्या फैलावत असताना फ्रान्सने आठ ऑक्सिजन जनरेटर, व्हेंटिलेटर्स व इतर वैद्यकीय उपकरणे भारतासाठी रवाना करण्याची तयारी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी या संकटाच्या काळात आपला देश भारतासोबत असल्याचे जाहीर केले.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी भारताला आवश्यक असलेले सहाय्य पुरविण्याची घोषणा केली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी देखील भारतासाठी सहाय्य पुरविण्याची घोषणा करून भारत व फ्रान्सच्या मैत्रीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या संकटाच्या काळात फ्रान्स भारतासोबत आहे आणि कोरोनाच्या साथीविरोधातील हा लढा दोन्ही देश जिंकल्यावाचून राहणार नाहीत, असा विश्‍वास राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी व्यक्त केला.

दरम्यान, इस्रायलने देखील भारताला सहकार्याची घोषणा केली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांनी इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मीर बेन-शबात यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त आहे. या चर्चेत शबात यांनी भारताला हवे असलेले सहकार्य इस्रायलकडून पुरविले जाईल, असे आश्‍वासन दिले. मित्र असलेल्या भारतासोबत इस्रायल ठामपणे उभा राहिल, अशी ग्वाही इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का यांनी दिली आहे.

leave a reply