पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

- पाऊण तासाच्या चर्चेत बायडेन यांच्याकडून सहाय्याचे आश्‍वासन

वॉशिंग्टन – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची चर्चा पार पडली. सुमारे पाऊण तास चालेलल्या या फोनवरील चर्चेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कोरोनाची साथ रोखण्यासाठी भारताला सर्वतोपरी सहाय्याचे आश्‍वासन दिले. अमेरिकेत कोरोनाची साथ भरात असताना, भारताने अमेरिकेला आवश्यक सहाय्य केले होते. आता अमेरिका भारताच्या मागे उभी राहणार आहे, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने व संरक्षण मंत्रालयाने देखील भारतासाठी तातडीने सहाय्य पोहचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविण्यास नकार देणार्‍या बायडेन यांच्या भूमिकेत झालेला हा बदल लक्षवेधी ठरतो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी झालेल्या चर्चेनंतर हा बदल झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

अमेरिकेचे लोकप्रतिनिधी, अमेरिकन उद्योगक्षेत्र, मुत्सद्दी आणि विश्‍लेषक यांनी भारताला कोरोनाच्या लसीसाठी आवश्यक असलेले सहाय्य पुरविण्यास नकार देणार्‍या बायडेन यांच्या प्रशासनाला धारेवर धरले होते. अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनीही बायडेन प्रशासनावरील दबाव वाढविला होता. यामुळे बायडेन यांच्या प्रशासनावर चौफेर टीका सुरू झाली होती. त्यानंतरही भारताला सहकार्य करण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने टाळण्याचा प्रयत्न करून पाहिला, असे दावे केले जात होते. मात्र भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्याशी चर्चा पार पडली. या चर्चेत डोवल यांनी अमेरिकेने भारताला सहाय्य केले नाही, तर भारतही अमेरिकेला यापुढे सहकार्य करणार नाही, याची जाणीव करून दिल्याचे दावे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालासाठी भारत अमेरिकेवर विसंबून आहे खरा. त्याचवेळी अमेरिकेचे औषधनिर्मिती क्षेत्र भारतातून निर्यात केल्या जाणार्‍या कच्च्या मालावर अवलंबून आहे. भारताने याचा पुरवठा रोखला, तर अमेरिकन फार्मा कंपन्यांची त्रेधा उडेल, याची जाणीव डोवल यांनी सुलिवन यांना करून दिल्याचे सोशल मीडियावर काहीजणांनी म्हटले आहे. अधिकृत पातळीवर याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पण बायडेन प्रशासनाच्या असहकार्याची जागा संपूर्ण सहकार्याने घेतली असून ही काहीशी चकीत करणारी बाब ठरते. विशेषतः हे सहाय्य पुरविण्यासाठी अमेरिका दाखवित असलेले तत्परता नजरेत भरणारी आहे.

अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनने आपण कोरोनाची साथ रोखण्यासाठी भारताला युद्धपातळीवर सहाय्य पुरविण्याची तयारी केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारताला आवश्यक असलेला पुरवठा अमेरिका करणार असून त्याच्या वाहतुकीचीही जबाबदारी आम्हीच पार पाडणार असल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी म्हटले आहे. अमेरिका भारताबरोबरील आपल्या सहकार्याला फार मोठे महत्त्व देते आणि संकटाच्या काळात भारतीय जनतेपर्यंत हे सहाय्य जलदगतीने पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा दावा किरबाय यांनी केला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील आपला देश भारताला आवश्यक असलेल्या गोष्टींचा अव्याहतपणे पुरवठा व्हावा, यासाठी बांधिल असल्याचे म्हटले आहे. बायडेन प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे उभय देशांचे संबंध अधिकच दृढ होतील, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.

leave a reply