भारत जागतिक अर्थकारणाला आकार देणारा देश बनला आहे

-पंतप्रधान नरेंद्र मोदी

गांधीनगर – अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूर यासारख्या जागतिक अर्थकारणाला आकार देणाऱ्या देशांमध्ये आता भारताचाही समावेश होत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी देशवासियांचे अभिनंदन केले. गुजरातच्या गांधीनगरजवळ ‘गुजरात इंटरनॅशनल फायनॅन्स टेक-जीआयएफटी’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमा पंतप्रधान बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ‘इंटरनॅशनल फायनॅन्शिअल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटीज्‌‍-आयएफएससीए’ आणि ‘इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज-आयआयबीएक्स’चे उद्घाटन पार पडले. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान उंचावत असताना, अशा संस्था देशासाठी अत्यंत आवश्यक ठरतात, याची जाणीव पंतप्रधानांनी यावेळी करून दिली.

modijiजगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक अशी भारताची ओळख बनली आहे. आत्ता आहे, त्यापेक्षाही पुढच्या काळात भारताचीअर्थव्यवस्था खूपच मोठी बनेल. त्याच काळासाठी आत्तापासूनच तयारी करणे भाग आहे. भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेतील आत्ताच्या काळातील व भविष्यातील भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी अशा संस्थांची नितांत आवश्यकता आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. ‘गुजरात इंटरनॅशनल फायनॅन्स टेक-जीआयएफटी’ अर्थात गिफ्ट सिटी हे भविष्याचा विचार करून उचललेले पाऊल हेोते. अर्थकारण आणि तंत्रज्ञान यांचे केंद्र बनविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

याबरोबरच ‘इंटरनॅशनल फायनॅन्शिअल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटीज्‌‍-आयएफएससीए’ व ‘इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज-आयआयबीएक्स’ आणि ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज-एनएसए’ या तिन्ही संस्था देशाला जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक समर्थपणे जोडणाऱ्या ठरतील, असा दावा पंतप्रधानांनी केला. मोठी बाजारपेठ इतक्यापुरतीच भारताची ओळख मर्यादित न राहता, यापुढे बाजारपेठ विकसित करणारा देश म्हणून भारताने पुढे यावे, अशी अपेक्षा यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली. ‘आयएफएससीए’ने सेवा व त्याचे दर यांच्या आघाडीवर दुबई व सिंगापूरशी स्पर्धा करावी. या क्षेत्रात जगाचे नेतृत्त्व करण्याचे ध्येय आपण आपल्यासमोर ठेवले पाहिजे, असा संदेश यावेळी पंतप्रधानांनी दिला.

सोने भारतीय महिलांच्या अर्थशक्तीचे मोठे माध्यम आहे. यामुळे समाज व सांस्कृतिक व्यवस्थेत सोन्याला अतिशय महत्त्व दिले जाते. पण सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार देश इतकीच भारताची ओळख असता कामा नये. तर भारताने सोन्याची बाजारपेठ विकसित करणारा देश बनावे. ‘आयआयबीएक्स’मुळे ही अपेक्षा पूर्ण होईल. यामुळे सोन्यामधील व्यवहार अधिकाधिक पारदर्शक होतील. यामुळे भारत सोन्याचे दर निश्चित करू शकेल. याचा साऱ्या जगावर प्रभाव पडल्यावाचून राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

येत्या काळात भारतात जे काही घडेल, त्याचा प्रभाव जगावर पडेल आणि त्यामुळे जगाला दिशा मिळेल. गेल्या कित्येक वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारताने जागतिक अर्थकारणाशी स्वतःला आत्मविश्वाने जोडून घेतलेले नव्हते. पण आत्ताची परिस्थिती बदललेली आहे. स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आत्मविश्वासाने भारलेला भारत जागतिक अर्थकारणाशी जोडून घेत आहे. एकाच वेळी भारत आपल्या स्थानिक आकांक्षा व आंतरराष्ट्रीय सहकार्य यांनाही महत्त्व देत आहे, असे सांगून पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा वापर केला जाईल, अशी ग्वाही दिली.

leave a reply