चीनच्या तिबेटमधील लष्करी हालचालींवर भारताच्या ‘इंटेलिजन्स सॅटेलाईट’ची टेहळणी – ‘एलएसी’च्या डेप्सांग भागातही चीनची जमवाजमव

नवी दिल्ली – भारत-चीन सीमारेषेवर दोन देशांमधील तणाव कायम असतानाच, भारताच्या ‘इंटेलिजन्स सॅटेलाईट’ने तिबेटमधील चीनच्या लष्करी हालचालींवर टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशशी जोडलेल्या सीमाभागात ‘एमिसॅट’ या उपग्रहाने टेहळणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय उपग्रहाच्या या टेहळणीच्या पार्श्वभूमीवरच, चीनने लडाखनजिक असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या भागात पुन्हा लष्करी जमवाजमव सुरू केल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

'इंटेलिजन्स सॅटेलाईट'

गेल्या महिन्यात लडाखमधील गलवान व्हॅली भागात झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराने चीनला चांगला दणका दिला होता. त्यानंतर चीनने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरुन माघारीचे संकेत दिले असले तरी दोन देशांमधील तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. लडाखमध्ये चीन आणि भारतामध्ये ८०० किलोमीटरची सीमारेषा आहे. येथील पॅंगोग सरोवर, चुमार, डेमचॉक व दौलत बेग ओल्डीमध्ये चिनी लष्कराकडून नेहमीच घुसखोरीचे प्रयत्न होतात. गलवानमधील संघर्षानंतर भारताने या सर्वच भागात आपली संरक्षणतैनाती चांगलीच वाढविली आहे. त्यामुळे दडपणाखाली आलेल्या चीनने भारताच्या सीमारेषेवरील इतर भागांमध्ये संघर्ष भडकविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

'इंटेलिजन्स सॅटेलाईट'

तिबेटसह लडाखनजिकच्या भागात सुरू असलेल्या लष्करी तयारीतून हीच बाब अधोरेखित होत आहे. मात्र त्याचवेळी चीनच्या लष्करी हालचालींवर भारताची नजरही रोखलेली आहे, हे ‘एमिसॅट’ या ‘इंटेलिजन्स सॅटॅलाईट’ने केलेल्या टेहळणीतून स्पष्ट झाले. ‘एमिसॅट’ हा भारत सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स’साठी आखलेल्या ‘प्रोजेक्ट कौटिल्य’चा भाग आहे. या उपग्रहाने शनिवारी तिबेटमधील चीनच्या लष्करी हालचालींचा वेध घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

'इंटेलिजन्स सॅटेलाईट'

दरम्यान, लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ असलेल्या ‘डेप्सांग’ भागात चीनच्या लष्कराने पुन्हा एकदा जमवाजमव सुरू केल्याचे वृत्त देण्यात आले आहे. चीनकडून या भागात लष्करी तुकड्या व सशस्त्र वाहने आणण्यात आली असून खोदकामही सुरू झाल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी २०१३ साली चीनच्या लष्कराने डेप्सांग भागातून भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या भागातील चीनची लष्करी जमवाजमव लक्ष वेधून घेणारी ठरते आहे.

या पार्श्वभूमीवरच, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर. पी. सिंग यांनी शनिवारी जम्मू डिव्हीजन मधील ‘फॉरवर्ड एरिआ’ला भेट दिली. या भेटीत त्यांनी बसोली, बकलोह व मामुन भागातील लष्करी सज्जतेची पाहणी केली. गलवान व्हॅलीत भारताकडून बसलेल्या दणक्यानंतर चीनने पाकिस्तान बरोबर संधान बांधून भारताच्या दोन्ही सीमांवर संघर्ष छेडण्याची योजना आखल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे वेस्टर्न कमांडच्या प्रमुखांची भेट महत्त्वाची मानली जाते.

leave a reply