भारत-जपान-ऑस्ट्रेलियाच्या ‘एससीआरआय’चा चीनला धक्का

‘एससीआरआय’बीजिंग – भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पुढाकार घेऊन ‘सप्लाय चेन रेझिलियन्स इनिशिएटीव्ह’ (एससीआरआय) अर्थात पुरवठा साखळीसंदर्भातील सहकार्य सुरू केले आहे. यामुळे सध्या जागतिक उत्पादनाचे एकमेव केंद्र किंवा जगाची फॅक्टरी मानल्या जाणार्‍या चीनला हादरा बसला आहे. यावर चीनची प्रतिक्रिया आली असून हे तिन्ही देश करीत असलेल्या कारवाया, जागतिक व्यापारी नियमांच्या विरोधात असल्याची टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. जग करोनाच्या साथीतून बाहेर पडून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत असताना, असे प्रयत्न ही प्रक्रिया धोक्यात आणू शकतात, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी दिला.

चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना सार्‍या जगात फैलावला. सुरूवातीच्या काळात याचा सर्वाधिक फटका चीनला बसला होता व यामुळे चीनचे उत्पादन क्षेत्र ठप्प झाले होते. जगाची फॅक्टरी मानल्या जाणार्‍या चीनमधील उत्पादन क्षेत्रालाह फटका बसल्यानंतर, जगभरातील प्रमुख देश व बहुराष्ट्रीय कंपन्यांना चीनला विश्‍वासर्ह पर्याय आवश्यक असल्याचे वाटू लागले होते. केवळ कोरोनामुळे ओढावलेली परिस्थितीच नाही, तर चीनची वर्चस्ववादी धोरणे व आपल्या आर्थिक-लष्करी ताकदीचा वर्चस्ववादी धोरणांसाठी वापर करण्याची चीनची अपप्रवृत्तीही आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय बनली आहे. सर्वाधिक व्यापार असलेल्या आपल्या भागीदार देशांबरोबरच चीनचे फार मोठे राजकीय वाद आहेत. त्यामुळे आपल्या उत्पादन क्षेत्राच्या सामर्थ्याचा वापर चीन राजकीय हेतू साधण्यासाठी करीत असल्याचेही वारंवार स्पष्ट झाले आहे. विशेषतः अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांनी त्याचा अनुभव घेतला होता.

या पार्श्‍वभूमीवर, चीनला पर्याय ठरणारी जागतिक पुरवठा साखळी उभी करण्याची तयारी भारत, जपान व ऑस्ट्रेलियाने केली आहे. ‘सप्लाय चेन रेझिलियन्स इनिशिएटीव्ह’ (एससीआरआय) हा या प्रयत्नांचा महत्त्वाचा टप्पा ठरतो. भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल, जपानचे व्यापारमंत्री काजियामा हिरोशी आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार व पर्यटन तसेच गुंतवणूकविषयक मंत्री डॅन टेहन यांनी ‘एससीआरआय’साठी पुढाकार घेतला. तिन्ही देश अधिक विश्‍वासार्ह पुरवठा साखळी विकसित करणार असल्याची घोषणा ‘एससीआरआय’द्वारे करण्यात आली आहे.

या व्हर्च्युअल परिषदेत संकटे व अडथळ्यांना दाद न देणारी विश्‍वासार्ह पुरवठा साखळी तयार करून त्याद्वारे सातत्यपूर्ण, भक्कम आणि संतुलित व सर्वसमावेशक विकासाचे ध्येय समोर ठेवण्यात आले. यावेळी व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी माहितीच्या देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित करून यामुळे क्षमता विकसित करण्यासाठी फार मोठे सहाय्य मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच गोयल यांनी यावेळी सध्याच्या पुरवठा साखळीचे परिक्षण करून यातील उणीवांचा शोध घेऊन त्या दूर करण्याचे आवाहन अधिकार्‍यांना केले. तसेच भारतात ज्याचे उत्पादन होते व ज्याची पुरवठा साखळीही आहे, अशी पाच उत्पादने निवडण्याचे आवाहन करून यासंदर्भातील माहिती जपान व ऑस्ट्रेलियाच्या कंपन्यांना पुरविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहनही व्यापारमंत्री गोयल यांनी अधिकार्‍यांना केले.

यामुळे जपान व ऑस्ट्रेलियाच्या कंपन्यांना आपल्या पुरवठा साखळीत वैविध्य आणण्यासाठी नवा पर्याय मिळेल, असा विश्‍वास गोयल यांनी व्यक्त केला आहे. मात्र एससीआरआयच्या या उपक्रमावर चीनने चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय उद्यागोसाठी लागणारी पुरवठा साखळी ही काही एकीकडून दुसरीकडे फिरविता येणारी बाब नाही. याचा लाभ दोन्ही बाजूंना मिळत असतो. तसेच अशारितीने पुरवठा साखळी दुसरीकडे वळविणे हे आंतरराष्ट्रीय व्यापारी नियमांच्या विरोधात जाणारे ठरते. तसेच यामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येऊ शकतो, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी दिला आहे.

leave a reply