गलवानमध्ये भारताने चीनचे १०० हून अधिक जवान ठार केले

- चीनच्या माजी सैनिकाचा दावा

वॉशिंग्टन – ‘१५ जूनच्या मध्यरात्री गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण संघर्षात भारतीय सैनिकांनी चीनच्या १००हून अधिक जवानांना ठार केले. पण चीनची कम्युनिस्ट राजवट ही माहिती आपल्या जनतेपासून दडवित आहे. कारण भारताबरोबरील संघर्षात ठार झालेल्या आपल्या जवानांची माहिती उघड केली तर, चीनच्या लष्करातील आजी-माजी जवान चीनच्या राजवटीविरोधात सशस्त्र बंड पुकारु शकतील. एवढेच नाही तर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातूनही आपल्या विरोधात बंडखोरी होऊ शकते, अशी भीती राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना सतावित आहे’, असा खळबळजनक दावा चीनच्याच कम्युनिस्ट पार्टीच्या माजी नेत्याचा मुलगा आणि माजी लष्करी अधिकारी जिआन्ली यांग यांनी केला आहे.

India-Chinaगलवान व्हॅलीमधील संघर्षाबाबतची माहिती उघड करण्यास जिनपिंग यांची राजवट अजिबात तयार नसल्याचा आरोप जियान्ली यांग यांनी ‘वॉशिंग्टन टाईम्स’ या वर्तमानपत्रातील लेखात केला. गेल्या काही दिवसांमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीयान यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये चिनी लष्कराच्या जीवितहानी बाबत उत्तर देण्याचे टाळले होते, याची आठवण यांग यांनी करून दिली. चीन जाहीरपणे आपले जवान ठार झाले, हे मान्य करायला तयार नाही. पण भारताने आपल्या प्रत्येक शहीद सैनिकांचा सन्मान केला, अशी जळजळीत टीका यांग यांनी केली.

‘चीन आपल्या शहिदांना आणि लष्करी सेवेत असलेल्या जवानांना सन्मान देत नसेल, तर निवृत्त सैनिकांची काय अवस्था असेल, याचा विचार केलेलाच बरा. १९७९ साली चीन-व्हिएतनाम युद्ध किंवा त्याआधीच्या कोरियन युद्धात सहभागी झालेल्या आपल्या निवृत्त जवानांची चीनच्या राजवटीकडून वारंवार अवहेलना केली जाते. गेली कित्येक वर्ष हे निवृत्त सैनिक पेन्शन, आरोग्य सुविधा आणि रोजगारासाठी कम्युनिस्ट राजवटीविरोधात निदर्शने करीत आहेत. पण चीनची राजवट त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही’, अशा शब्दात यांग यांनी कैफियत मांडली.

चीनमध्ये ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’चे (पीएलए) सुमारे पावणे सहा कोटी निवृत्त जवान आहेत. हे जवान दरवर्षी पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी निदर्शने करतात. पण जिनपिंग राजवटीकडून या निवृत्त जवानांवर कारवाई केली जाते, असे सांगून यांग यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बीजिंगसह चीनच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात या निवृत्त जवानांनी केलेल्या निदर्शनांचा दाखला दिला. त्यातच जिनपिंग यांनी जवानांचे रोजगाराचे मार्गही बंद केल्याने या निवृत्त जवानांमध्ये जिनपिंग राजवटीविरोधात कमालीचा संताप खदखदत असल्याचा दावा यांग यांनी केला.

अशा परिस्थितीत गलवानमधील संघर्षात भारतीय सैनिकांपेक्षा चिनी जवानांचा अधिक पटीने बळी गेल्याचे जाहीर केल्यास त्याचे परिणाम राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना सहन करावे लागतील व असंतुष्ट माजी जवान याचा फायदा घेऊन चिनी राजवटीवर तुटून पडतील, अशी चिंता चीनच्या सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. एकदा का चीनमध्ये माजी जवानांनी बंड पुकारले तर चीनची पोलादी व्यवस्थाही परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही, याची जाणीव राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून जिनपिंग चिनी लष्कराला आपल्यावर संपूर्ण निष्ठा ठेवण्याचे आवाहन करीत आले आहे.

leave a reply