आसामच्या पुरातील बळींची संख्या ३४ वर

बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळून ३१ जण दगावले

Aasam-Floodदिसपूर/लखनऊ/पाटणा – मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसाममधील पूर परिस्थिती गंभीर झाली आहेत. या पुरातील बळींची संख्या ३४ वर पोहोचली असून २२ जिल्ह्यातल्या १६ लाखांहून अधिक जणांना या पुराचा फटका बसला आहे. तर आसाममधील ७२,७१७ हेक्टर इतकी शेती पाण्याखाली वाहून गेली. तसेच बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये वादळी पावसा दरम्यान वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ३१ जणांचा बळी गेला.

Aasam-Floodगेल्या आठवड्याभरापासून आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात ब्रम्हपुत्रा आणि उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आसामचा पुराचा धोका वाढला आहे. आसामच्या २२ जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. आसामच्या बारपेटा जिल्ह्याला पुराचा जोरदार फटका बसला असून यात साडे आठ लाखांहून अधिक जण विस्थापित झाले. आसामच्या १६३ मदत शिबिरांमध्ये या सर्वांना हलविले जात आहे. गेल्या २४ तासात आपत्ती निवारण पथक आणि प्रशासनाने २८५२ जणांना सुरक्षित स्थळी हलविले.

Aasam-Floodमदतकार्य वेगाने सुरु आहे. पण कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे त्यात अडथळे येत आहेत. आसामचे काझीरंगा अभयारण्य आणि पोबीतोरा अभयारण्य पाण्याखाली गेले आहे. या पुरामुळे या अभयारण्यातले २६ प्राणी मृत्यूमखी पडले. तर हजारो प्राण्यांना सुरक्षित आसरा दिला जात आहे. पुढचे काही दिवस आसाममध्ये ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, बिहारमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ जणांचा बळी गेला. गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. प्रशासन आणि आपत्ती निवारण पथकाने मदतकार्य सुरु केल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. गेल्या आठवड्याभरात बिहारमध्ये वीज कोसळून १०० जणांचा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारला पुराने वेढले होते. अजूनही राज्यात पाऊस सुरु असून पुन्हा पुराचा धोका आहे. बिहारबरोबर उत्तरप्रदेशमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण ठार झाले असून १२जण जखमी झाले आहेत.

leave a reply