कोरोनाच्या सर्वाधिक बळी गेलेल्या देशांमध्ये भारत सहाव्या स्थानी

कोरोनाच्या साथीत दागवलेल्यांची संख्या ३२ हजारांवर पोहोचली

नवी दिल्ली – देशात जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर कमी असला, तरी भारतात आतापर्यंत ३२ हजाराहून अधिक जण या साथीत दगावले आहेत. यामुळे कोरोनाच्या सर्वाधिक बळी जाणाऱ्या देशांमध्ये भारत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. आतापर्यंत फ्रान्स कोरोनाच्या बळींच्या सांख्येबाबत सहाव्या स्थानावर होता.

देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १३ लाख ८३ हजारांवर पोहोचली आहे. सलग तिसऱ्यादिवशी देशात सुमारे ४९ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी देशात ७५७ जणांचा बळी गेला होता, तर गुरुवारी हजाराहून अधिक बळींची नोंद झाली होती. त्यामुळे केवळ तीन दिवसात देशातील या साथीच्या बळींची संख्या ३० हजाराहून ३२ हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रातील बळींची संख्या १३ हजारांच्या पुढे गेली आहे.

शनिवारी महाराष्ट्रात २५७ जण दगावले आणि ९ हजार २५१ नवे रुग्ण आढळले. आंध्र प्रदेशात ५२ जणांचा बळी गेला, तर ७८१३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत ८९ जणांचा बळी गेला आणि ६९८८ नवे रुग्ण आढळले. कर्नाटकात चोवीस तासात ७२ जण दगावले आहे आणि ५ हजार नवे रुग्ण आढळले. दिल्लीत २९ जण दगावले. तसेच गुजरातमध्ये चोवीस तासात २२ कोरोना रुग्णांचा बळी गेला.

दरम्यान देशात कोरोनाचे टेस्टिंग वाढविण्यात आले आहे. शुक्रवारी चोवीस तासात ४ लाख २० हजार कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या वाढलेल्या चाचण्यामुळे देशात या साथीच्या रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. जगात अमेरिकेनंतर भारतात सार्वधिक चाचण्या झाल्या आहेत.

leave a reply