पाकिस्तानच्या हल्ल्यांविरोधात अफगाणिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघात तक्रार

Afghanistan-Pakistanकाबुल – पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या सीमाभागात सुरू असलेल्या हल्ल्यांविरोधात अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली आहे. अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत याचा निषेध नोंदविणारे पत्र दिले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये १० जणांचा बळी गेला असून त्यात चार अफगाणी जवानांचा समावेश आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानमध्ये सहा ते साडेसहा हजार पाकिस्तानी दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर संघर्ष पेटला आहे. पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या सीमेवरील कुनार प्रांतातल्या अफगाणी लष्कराच्या चौक्या आणि नागरी वस्तीत हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानी लष्कराने तोफांचा तसेच रॉकेट्सचा मारा केला असून यात १० जणांचा बळी गेला. सीमाभागातील अनेक घरांसह इतर मालमत्तेची प्रचंड नासधूस झाली आहे. अफगाणी सीमा सुरक्षादलानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यात काही नुकसान झाले नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

Afghanistan-Pakistanअफगाणिस्तानने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानचा निषेध केला होता. पण त्यानंतरही पाकिस्तानकडून हल्ले सुरुच राहिले होते. अखेर संयुक्त राष्ट्रसंघातील अफगाणिस्तानच्या राजदूत अदेला राझ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहून पाकिस्तान सीमेवर करीत असलेल्या हल्ल्यांप्रकरणी तक्रार केली आहे. ‘पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सार्वभौम भूमीत चिथावणीखोर कारवाया करीत आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियम व मानवाधिकारांचे उल्लंघन करीत आहे. अफगाण सरकार याचा तीव्र निषेध करीत आहे’, असे या पत्रात म्हंटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने याची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहनही अफगाणिस्तानने केले आहे.

याआधीही पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवर अशी आगळीक केली होती. त्यावेळीही अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानची तक्रार केली होती. या हल्ल्यामागे तालिबान असल्याचा आरोपही अफगाणिस्तानातून होऊ लागला आहे. २०१७ साली पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्यावेळी दोन्ही बाजूचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतरही हा तणाव कायम राहिला होता.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे सहा ते साडेसहा हजार दहशतवादी सक्रीय असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केला आहे. यातील बरेचसे दहशतवादी ‘तेहरिक-ए-तालिबान’चे आहेत. त्याचवेळी ‘अल-कायदा’ ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातील १२ प्रांतामध्ये सक्रिय असून ‘आयएस’चे दोन हजारांहून अधिक दहशतवादी अफगाणिस्तानात असल्याचेही अहवालात सांगितले आहे.

leave a reply