भारतात कोरोनाच्या एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

रुग्णांची नोंदनवी दिल्ली – जगात कोणत्याही देेशात एका दिवसात नोंद झाले नव्हते इतक्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी भारतात झाली. देशात चोवीस तासात ३ लाख १४ हजार ८३५ नवे रुग्ण आढळले, तसेच २ हजार १०४ जणांचा बळी गेला. जानेवारी महिन्यात अमेरिकेत चोवीस तासात कोरोनाच्या २ लाख ९७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

देशात कोरोनाच्या साथीमुळे अवस्था अधिकाधिक बिकट होत चालली आहे. कोरोनाच्या या नव्या लाटेने अद्याप शिखर गाठले नसून मे महिन्याच्या मध्यावर ही कोरोनाची लाट शिखरावर पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. देशात महाराष्ट्र हे कोरोनाने सर्वाधिक प्रभावीत राज्य असून गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांमध्येही कोरोनाचे चोवीस तासात उच्चांकी रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे सर्वच राज्यात मृत्यूदर वाढला असून बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या दरात घट होत आहे.

गुरुवारी रात्रीपर्यंत देशातील विविध राज्यांनी जाहीर केलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची माहिती पाहता चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक नोंदविला जाईल, असे स्पष्ट दिसत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात ५६८ जणांचा बळी गेला, तर ६७ हजार नवे रुग्ण आढळले. उत्तर प्रदेशातही १९५ जण दगावले आणि ३४ हजार नवे रुग्ण आढळले. केरळात २७ हजार, कर्नाटकात २५ हजार, राजस्थानात १४ हजार, मध्य प्रदेशात १२ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली.

या भरमसाठ वेगाने वाढणार्‍या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर पुर्णपणे निर्बंध लावले आहेत. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या वाहनांची कोणतीही अडवणूक न करताना त्यांना एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाऊ दिले जावे, असे स्पष्ट निर्देश केंद्राने सर्व राज्य प्रशासनांना दिले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या वाहनांना अडवता येणार नाही. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍यांवर व उत्पादकांवर त्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशातच पुरवठा करण्याचे बंधन नसेल, असे केंद्राने दिलेल्या निर्देशात स्पष्ट म्हटले आहे.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरिय बैठक घेतली. त्यानंतर यासंदर्भात निर्देश देण्यात आले. तसेच शुक्रवारीही पंतप्रधान ऑक्सिजन पुरवठादारांबरोबर औषध उत्पादक व पुरवठादारांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय कोविन आणि आरोग्य सेतू प्लॅटफॉर्मद्वारे १८ वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणासाठी नोंदणी शनिवारपासून सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच केंद्र सरकारने लसीचे आपले धोरण लवचिक केले याचा अर्थ ही लस औषधांच्या दुकानात विकली जाईल, असा नाही, हेसुद्धा आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवार रात्री आठ वाजल्यापासून १ मेच्या सकाळपर्यंत निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. यानुसार आता सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीने काम सुरू राहणार आहे. तसेच नव्या नियमावलीनुसार सामान्य प्रवाशांना रेल्वे, मेट्रोची दारे बंद होणार आहेत. याशिवाय एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात अत्यावश्यक कारणांसाठी जाता येईल. मात्र दुसर्‍या जिल्ह्यात जाणार्‍यांना १४ दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. लग्न समारंभही २५ जणांच्या उपस्थितीतच केवळ दोन तासात पार पाडावे लागणार आहे.

leave a reply