भारत-रशिया न्याय्य व बहुस्तंभिय जगाचे पुरस्कर्ते

- रशियाचे परराष्ट्र मंत्रालय

मॉस्को – भारत आणि रशिया अधिक न्याय्य व बहुस्तंभिय जागतिक व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत. कित्येक आंतरराष्ट्रीय मुद्यांवरील भारत व रशियाची भूमिका जवळपास सारखीच आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा रशिया दौरा सुरू होत असताना, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केलेले हे दावे लक्षणीय ठरतात. युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या आवाहनांच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या रशिया भेटीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे, असा दावा केला जातो.

भारत-रशिया न्याय्य व बहुस्तंभिय जगाचे पुरस्कर्ते - रशियाचे परराष्ट्र मंत्रालयपरराष्ट्रमंत्री जयशंकर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याशी चर्चा करतील. यामध्ये उभय देशांमधील व्यापार, गुंतवणूक यांच्यासह उभय देशांच्या चलनांमध्ये व्यापार करण्याच्या मुद्याचा समावेश आहे. भारत व रशिया रुबलमध्ये व्यवहार करणार असून यासाठी दोन्ही देशांनी पावले उचलली आहेत. यानुसार रशियन बँका व कंपन्या भारतीय बँकांमध्ये खाती उघडत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात रशिया हा भारताला सर्वाधिक प्रमाणात कच्चे तेल पुरविणारा देश बनला होता. यामुळे भारताच्या रशियाबरोबरील रुपया व रुबलमधील व्यवहाराचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यामुळे भारताच्या रुपयाची विश्वासार्हता अधिक प्रमाणात वाढणार असून रशियाप्रमाणे इतर देश देखील रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखवित आहेत.

याबरोबरच उर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सहकार्यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्यात चर्चा होईल. तसेच ‘आशिया व पॅसिफिक’ महासागरातील सुरक्षाविषयक संरचनेवर दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती रशियन परराष्ट्र मंत्रालयाने दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्दे व समस्यांवरही जयशंकर व लॅव्हरोव्ह विचारविनिमय करणार आहेत, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या साऱ्या राजनैतिक पातळीवरील चर्चेच्या पलिकडे जाऊन जयशंकर व लॅव्हरोव्ह यांच्या भेटीकडे सारे जग पाहत असल्याचा दावा केला जातो.

रशिया व युक्रेनमधील युद्ध रोखण्यात भारताला यश मिळेल का, याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. एकाच वेळी रशिया व युक्रेनशीही उत्तम संबंध असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. इतकेच नाही तर भारताने युक्रेनचे युद्ध रोखण्यासाठी योगदान देण्याची तयारी दाखविली होती. रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या झॅपोरिझिआ येथील अणुप्रकल्पाच्या क्षेत्रात घनघोर संघर्ष सुरू असताना, हा युरोपातील सर्वात मोठा अणुप्रकल्प धोक्यात आला होता. या संघर्षामुळे इथून किरणोत्सर्ग सुरू होईल, या भीतीने युरोपसह जगालाही ग्रासले होते. मात्र भारताने मध्यस्थी करून रशियाला रोखण्याचे फार मोठे काम केले व यामुळे युक्रेनलाही तडजोड करावी लागली होती.

भारताने पार पाडलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीची आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी तितकी चर्चा झाली नाही. तरीही भारताने युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. म्हणूनच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या या रशियाभेटीचे महत्त्व अधिकच वाढले असून भारताला हे युद्ध रोखण्यात यश मिळेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी देखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. याकडेही माध्यमे लक्ष वेधत आहेत. तर युक्रेनने रशियाशी चर्चा करावी म्हणून भारताने आवाहन केले होते, पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्याला नकार दिल्याच्या बातम्या काही वृत्तसंस्थांनी दिल्या आहेत. जोवर व्लादिमिर पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर आहेत, तोवर चर्चा शक्य नसल्याची ताठर भूमिका युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली आहे. मात्र युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे अणुयुद्धात रुपांतर होण्याची दाट शक्यता समोर येत असताना, तसेच अमेरिकेतही फार मोठे राजकीय बदल संभवत असताना, या युद्धाबाबत बायडेन प्रशासनाची भूमिका बदलल्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, हे युद्ध रोखण्यासाठी भारत करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता अधिकच वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply