‘टेंपल माऊंट’वरून इस्रायलच्या भावी पंतप्रधानांना जॉर्डनचा इशारा

‘टेंपल माऊंट’वरूनअम्मान – बेंजामिन नेत्यान्याहू लवकरच इस्रायलचे पंतप्रधान होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर आखाती क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. जेरूसलेममधील टेंपल माऊंटवरून जॉर्डनने इस्रायलचे भावी पंतप्रधान नेत्यान्याहू यांना इशारा दिला. इस्रायलच्या आगामी सरकारने यासंदर्भातील वादग्रस्त निर्णय टाळावा, अन्यथा इस्रायल व जॉर्डनमधील संबंध बिघडतील, असे जॉर्डनने बजावले.

याआधीही टेंपल माऊंट तसेच इतर मुद्यांवरुन नेत्यान्याहू सरकार आणि जॉर्डनमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. सहा महिन्यानंतर इस्रायलच्या निवडणुकीत नेत्यान्याहू यांची प्रखर राष्ट्रवादी पक्षांची आघाडी निवडून आल्याबरोबर जॉर्डनने सावध भूमिका स्वीकारली आहे. नेत्यान्याहू यांचे सरकार स्थापन होण्याआधीच जॉर्डनने इस्रायलच्या भावी पंतप्रधानांना इशारा दिला. नेत्यान्याहू यांच्या नव्या सरकारने टेंपल माऊंटची यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नये, असे जॉर्डनच्या अधिकाऱ्यांनी धमकावले.

तसेच नेत्यान्याहू यांच्या सरकारमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीचे बेन ग्वीर यांना मंत्रीपद मिळाल्यास त्यांची टेंपल माऊंटची भेट रोखावी, असे आवाहन जॉर्डनने केले आहे. याआधी इस्रायलचे संसद सदस्य म्हणून बेन ग्वीर टेंपल माऊंटला भेट दिल्यानंतर जॉर्डनसह इतर अरब-आखाती देशांकडून प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

leave a reply